Sonali Bendre On Cham Cham Karta Hai : आपल्या अदा आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. मराठमोळ्या सोनालीने बॉलीवूडमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली. पण, मराठी प्रेक्षकांच्या मनात तिची खास जागा निर्माण केली ती ‘चम चम करता हैं’ या गाण्याने. या गाण्यातील सोनालीचा डान्स आजही सर्वांच्या लक्षात आहे. विशेष म्हणजे, एवढं गाजलेलं गाणं करण्यासाठी सोनालीने एक रुपयाही घेतला नव्हता. नुकत्याच एका मुलाखतीत तिने स्वतः याबाबत खुलासा केला.

सोनाली बेंद्रेने मित्रम्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेविश्वात आलेले अनुभव आणि आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी बॉलीवूडसह तिने मराठी कलाविश्वामध्ये केलेल्या कामाचा उल्लेख केला. यावेळी मराठीमध्ये सोनालीला प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या ‘चम चम करता हैं’ गाण्याची तिने आठवण सांगितली. सोनाली म्हणाली, “मी हे गाणे करण्यासाठी कोणतेही मानधन घेतले नव्हते.”

गाण्याआधी मी ‘अनाहत’ सिनेमा केलेला – सोनाली बेंद्रे

सोनाली म्हणाली, “मी ‘चम चम करता हैं’ गाणे करण्याआधी एक मराठी सिनेमा केला होता. पण, कोणीच त्याची कधीच चर्चा केली नाही. मी अमोलजींचा ‘अनाहत’ सिनेमा हा ‘चम चम करता हैं’ गाण्याच्या आधी केला होता. मी माझ्या करिअरच्या शिखरावर असताना तो एक मराठी सिनेमा केलेला आहे.”

पुढे ती म्हणाली, “मला ‘चम चम करता हैं’ गाण्याच्या वेळी एक फोन आला आणि सांगितले की, हे एक नवीन दिग्दर्शक आहेत. त्यावेळी ते सर्वजण नवीन होते. चांगले गाणे आहे आणि थोडासा मराठी सिनेमाला एक बूस्ट हवाय, त्यामुळे मी हे गाणे केले होते. मला त्यासाठी कोणतंही मानधन मिळाले नव्हते. माझ्यातर्फे मी मराठीसाठी जे करू शकत होते, ते मी केले. फराहने कोरिओग्राफी केली होती, मी डान्स केला आणि ते गाणं केलं. ‘चम चम करता हैं गाणे करून माझ्यातर्फे काही मदत होणार असेल तर ते मी करणार या विचारानं ते गाणे केले.”

Sonali Bendre in Cham Cham Karta Hai song dance pose and Mitramhane podcast interview
सोनाली बेंद्रे

२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ सिनेमातील हे ‘चम चम करता है’ गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले होत. मराठी सिनेमातील हे गाणे विशेष गाजले होते. अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर चित्रित झालेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने केलं होतं, तर वैशाली सामंत यांच्या आवाजाने गाण्याला वेगळी रंगत आणली होती. तसेच अजय-अतुलने संगीत दिलं होतं.