सोनाली खरेने आजवर अनेक लोकप्रिय चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहच्या ‘नशीबवान’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सोनालीने मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशाच एका हिंदी प्रोजेक्टच्या शूटदरम्यान सोनालीला तिच्या खऱ्या आयुष्यातील हिरो भेटला. सेटवर ओळख झाली, पुढे दोघांमध्ये छान मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यावर सोनालीने बिजय आनंद यांच्याशी लग्न केलं.
काही वर्षांपूर्वी सोनाली आणि तिच्या पतीमध्ये तब्बल २७ वर्षांचं अंतर आहे अशा चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. परंतु, अभिनेत्रीने अनेकदा या सगळ्या अफवा आहेत, ही माहिती खोटी आहे असं सांगितलं आहे. नुकत्याच कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा सोनालीने टीकाकारांना स्पष्ट उत्तर दिलं आहे.
सोनाली खरे सांगते, “माझी अन् माझ्या नवऱ्याची भेट एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान झाली होती. मढला शूट होतं आणि खूप पाऊस पडत होता. आमचं शूट फक्त चार दिवसांचं होतं पण, त्या पावसामुळे ते शूट जवळपास पंधरा दिवस लांबलं. त्यामुळे आमच्यात खूप छान मैत्री झाली. दोन ते अडीच वर्षे आम्ही डेट केलं. त्यानंतर आईने सांगितलं एकतर लग्न कर किंवा ब्रेकअप कर. अर्थात तेव्हा आम्ही दोघंही रिलेशनशिपबाबत सिरिअस होतो. बिजयने मला प्रपोज केलं आणि आम्ही लग्न केलं. सगळे निर्णय आम्ही फार विचार करून घेतले होते.”
“बिजय पंजाबी आहे तर, मी मराठी आहे. या सगळ्याचा विचार आम्ही लग्नाआधी केला होता. आमच्यात जवळपास ८ वर्षांचं अंतर आहे…सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी मला छळलं होतं की, सोनाली खरे आणि बिजय आनंद यांच्यात २७ वर्षांचं अंतर आहे वगैरे…पण हे अतिशय चुकीचं आहे. माझा तेव्हा जन्मही झाला नव्हता. काहीही बोलण्याआधी जरा तरी विचार करा…बरं एकाने टाकल्यावर सगळ्यांनी तेच केलं. पण, आजही मी सर्वांना सांगते आमच्यात फक्त ८ वर्षांचं अंतर आहे.” असं अभिनेत्रीने स्पष्ट केलं.
थेट जन्मतारीख सांगितली होती…
याआधी सोनाली खरे प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, “आमच्यामध्ये २७ वर्षांचं अंतर अजिबात नाहीये. माझा जन्म आहे ५ डिसेंबर १९७८ आणि माझ्या नवऱ्याचा जन्म आहे १९७० सालचा. आता मी आमच्या जन्मतारखा खूप उघडपणे सगळीकडे सांगते. खरंतर बायका त्यांचं वय असं उघडपणे सांगत नाहीत. पण, मी सांगतेय आमच्यात फक्त ८ वर्षांचं अंतर आहे.”
“८ वर्षांचं अंतर असण्यात कुठेही काही वावगं नाहीये. जरी आमच्यात यापेक्षा जास्त अंतर असतं किंवा ज्या जोडप्यांमध्ये जास्त अंतर आहे ते काही चुकीचं नाही. कारण, जर दोन व्यक्तींना एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्यासाठी त्यांची साथ योग्य वाटत असेल, तर त्याच्यासमोर जात-पात, वय अशा काहीच गोष्टी नसतात.” असं सोनाली खरेने स्पष्ट केलं होतं.
