Sonali Khare and Bijay Anand On Parenting : अभिनेत्री सोनाली खरे व प्रसिद्ध अभिनेते बिजय आनंद यांनी २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. एका मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये छान मैत्री झाली अन् पुढे काही वर्षांनी सोनाली व बिजय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने कोर्ट मॅरेज केलं होतं. सोनाली व बिजय या दोघांनाही फिरण्याची प्रचंड आवड आहे. नुकत्याच दिलेल्या ‘द अनुरुप शो’च्या मुलाखतीत या दोघांनी लग्न, पालकत्व अशा बऱ्याच गोष्टींवर आपलं मतं मांडलं.
सोनाली व बिजय आनंद यांच्या लेकीचं नाव आहे सनाया. आपल्या आईप्रमाणे सनायाने देखील सिनेविश्वात पदार्पण केलं आहे. ऋजुता देशमुखने जेव्हा सोनाली खरे व बिजय आनंद यांना सनायाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा बिजय यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं.
मुलगी व्हावी म्हणून प्रार्थना केली होती…
बिजय आनंद म्हणाले, “एक गोष्ट मी आधीच ठरवली होती मुलगा झाला तर कोणाला तरी देऊन टाकायचा आणि मुलगी झाली तर ठेऊयात.” बिजय आनंद यांना मनापासून आपल्याला मुलगी व्हावी असं वाटत होतं. यासाठी त्यांनी मंदिरात प्रार्थना सुद्धा केली होती.
याबाबत बिजय आनंद म्हणाले, “मी आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलं असेन, माझं जे काही चांगलं कर्म असेल… तर प्लीज देवा मला मुलगी होऊदेत एवढीच माझी इच्छा होती.”
बाबा भयंकर शिस्तीचा आहे अन् लाडही जेवढेच करतो…
सोनाली याबद्दल म्हणाली, “बिजयचं पहिल्यापासून असं खूप होतं की, आपल्याला मुलगी झाली पाहिजे. सुदैवाने त्याची इच्छा पूर्ण झाली आणि सनायाचा जन्म झाला. लग्नानंतर वर्षभराने आम्हाला सनाया झाली. आम्हाला दोघांनाही फिरायला भयंकर आवडतं पण, सनाया झाल्यावर वर्षभर आम्ही कुठेही गेलो नव्हतो. हळुहळू सनाया सुद्धा आमच्याबरोबर सगळीकडे फिरू लागली. तिलाही आता फिरायला खूप आवडतं. तिला योग्य संस्कार मिळायला हवेत याकडे आमचा कल होता. सनायाचं जेवण, खाण्या-पिण्याच्या सवयींच्या बाबतीत बिजय खूप स्ट्रिक्ट असायचा, स्ट्रिक्ट पॅरेटिंग तुम्ही म्हणू शकता. तिचा बाबा भयंकर शिस्तीचा आहे. तिलाही हे माहितीये की, घरात बाबाच्या शब्दापुढे काहीही नाहीये. पण, तिला हे सुद्धा माहितीये की, बाबा कितीही ओरडला तरी आपले लाडही सर्वात जास्त तोच करतो. कदाचित माझ्यापेक्षाही तिचे जास्त लाड बाबाकडून होतात. अनेकदा माझी चिडचिड होते…अरे तिला किती लाडावशील? असं सगळं आमच्या घरी सुरू असतं.”
