Sonali Kulkarni on Superstition: महाराष्ट्र सध्या अशोक खरात प्रकरणामुळे हादरून गेला आहे. सुशिक्षित वर्गातील लोकही भोंदूबाबांच्या भूलथापांना बळी पडून स्वतःचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करून घेतात, हे भयंकर वास्तव या प्रकरणाने पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

विज्ञानाच्या युगातही समाज अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला पाहून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने संताप व्यक्त केला आहे. अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रातील सुशिक्षित लोकही भोंदूबाबांच्या जाळ्यात कसे अडकतात, हे वास्तव समोर आलं आहे. यावर सोनालीने समजाला जागृत होण्याचे आवाहन केले आहे.

“महिलांवर घृणास्पद अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि भावनिक शोषण… हे सगळं आपल्या अवतीभवती घडतंय, आपण ठगले जातोय,” अशा शब्दात तिने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक वेळीच ओळखून समाजातील ही घाण साफ करण्याची गरज आहे, तिने या पोस्टमध्ये अधोरेखित केलं आहे.

Award Banner

सोनाली कुलकर्णीची पोस्ट

आता तरी श्रध्दा आणि अंधश्रद्धा ह्यातला फरक समजून घेऊया..
महिलांवर घृणास्पद अत्याचार, लैंगिक खुळाचार, आर्थिक फसवणूक, ऐय्याशी, भावनिक शोषण.. दांभिकता..
किती संतापजनक, केवढी पिळवणूक..
अजूनही आपण म्हणणार का – की आमच्याच धर्मातली अंधश्रध्दा का दिसते..
आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको..?
की माझी ती पवित्र अस्वच्छता आणि दुसऱ्याची ती दुर्गंधी..???
महाराष्ट्रात, आपल्या भवताली हे घडतंय..
आपण ठगले जातोय.. जागे होऊया,
अशी पोस्ट सोनाली कुलकर्णीने फेसबूकवर केली आहे.

सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात कसलाही फरक नाही. श्रद्धा या शब्दातच आंधळेपणाने ठेवलेला विश्वास आहे. डोळस श्रद्धा हा प्रकारचं अस्तित्वात नाही. श्रद्धा ही अंधच असते,’ ‘शिव शाहू फुले आंबेडकर विचार परत रुजवण्याची गरज आहे,’ ‘श्रद्धा या शब्दाला सुंदर, अध्यात्मिक अर्थ आहे.. त्यामुळे अंधश्रद्धा हा शब्दच चुकीचा आहे..भंपक, खुळचट विश्वास.. अंधविश्वास असं म्हणा हवं तर..’, अशा प्रकारच्या कमेंट्स या पोस्टवर आहेत.