Sonali Kulkarni on Narendra Dabholkar: सोनाली कुलकर्णीने ‘प्यार तुने क्या किया’, ‘सिंघम’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘गुलाबजाम’, अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटांत काम केले आहे. नुकतीच अभिनेत्री सुशीला-सुजीत या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपूर्वीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने नरेंद्र दाभोळकरांबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम केल्याचे वक्तव्य केले. तसेच नरेंद्र दाभोळकरांचा मृत्यू हे वेदनादायी वास्तव्य असल्याचेदेखील अभिनेत्री म्हणाली.

सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी अनेक वर्षे नरेंद्र दाभोळकरांबरोबर काम केलं. नरेंद्र काकांचा खून हे मनावरून कधीही न पुसलं जाणारं वेदनादायी वास्तव आहे, असं मला वाटतं. देवावर विश्वास हा आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे, तो कोणीच काढून घेत नाही.

पुढे अभिनेत्री म्हणाली, “तुम्ही अमुक एका धर्माला जास्त जपा आणि तमुक धर्माबद्दल सगळी सूट देऊन टाका, असं कुठेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे म्हणणं नव्हतं. तो आपापला हक्क आहे. पण, कोणत्याही कारणासाठी माणसाचं मानसिक, लैंगिक, आर्थिक शोषण होतं, भ्रूणहत्या होतात, तेव्हा कुठेतरी त्या अंधश्रद्धेला थांबविण्याची गरज असते. आपण शेजारी म्हणून कॉलेज, नोकरीच्या ठिकाणचे सहकारी म्हणून एकमेकांना जागं करण्याची गरज असते आणि माझ्यापुरतं सांगायचं तर मी माझ्यातला स्वयंसेवक पूर्ण ताकदीनिशी जागा ठेवलेला आहे.”

चित्रपटांनी मला घडवलं आहे, असे वक्तव्य करत सोनाली कुलकर्णी म्हणाली की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात रमाबाई आंबेडकरांची भूमिका केली होती. त्या सिनेमाने मला घडवलं. डॉक्टर जब्बार पटेलांनी मला घडवलं आहे. त्यांच्या मुक्ता नावाच्या सिनेमात काम केले आहे. स्मिता तळवलकरांच्या घराबाहेर या सिनेमातदेखील काम केले आहे.”

“माझ्या सिनेमांनी मला खूप घडवलं आहे, हे मी का सांगत आहे, तर समजण्यासाठी खूप सोपं असं माध्यम होतं. त्या-त्या भूमिका करताना मला आपला देश समजत गेला. डॉक्टर जब्बार पटेलांनी त्यांच्या चित्रपटांमधून ज्याप्रकारे आपल्या देशातील जाती-व्यवस्थेचे पदर उघडून दाखवले, ते कुठे ना कुठे माझ्या मनावर संस्कार करणारे होते. डॉक्टर आंबेडकर चित्रपटातील रमाबाई ही भूमिका साकारल्यानंतर मला असं वाटलं की मला कुठलीही जात नको.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोनाली कुलकर्णीने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.