Sonali Kulkarni : मानखुर्द परिसरात बुधवारी ( २९ एप्रिल ) रात्री मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. येथील उड्डाणपुलाच्या खोदकामासाठी आणलेलं भलंमोठं यंत्र मंगळवारी रात्री रस्त्यावर कोसळल्यामुळे बुधवारी दिवसभर आणि रात्री सुद्धा या संपूर्ण परिसरात ( शीव-पनवेल मार्ग ) मोठी वाहतूक कोंडी झाली होती. १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालक जवळपास चार ते पाच तास वाहतूक कोंडीत अडकले होते. हाच अनुभव लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला देखील आला.
सोनाली आपल्या गाडीने बुधवारी रात्री पुण्याच्या दिशेने निघाली होती. पण, या प्रवासादरम्यान रस्त्यात मानखुर्द ब्रिजवर ती जवळपास पाच तास वाहतूक कोंडीत अडकली. एकाच ठिकाणी पाच तास खोळंबल्यामुळे तिच्यासह अन्य प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच मानखुर्द ब्रिजवर कशाप्रकारे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या, हेदेखील तिच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सोनाली व्हिडीओमध्ये सांगते, “नमस्कार, मी मानखुर्द ब्रिजवर आहे…आता जवळपास पाच तास झाले आहेत, आणि गेल्या पाच तासांपासून मी याठिकाणी वाहतूक कोंडीत अडकले आहे. मी पुण्याला चालले होते…पण, तुम्ही माझ्या आजूबाजूला कशाप्रकारे ट्राफिक जाम झालंय हे पाहून शकता. आम्ही ट्राफिक कंट्रोल टीमला सुद्धा फोन केला पण, त्यांचं असं म्हणणं आहे की…शांत राहा, पॅनिक होऊ नका. कारण, ही वाहतूक कोंडी खूप मोठी आहे. त्यांना सुद्धा कल्पना नाहीये की, ही वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन सगळं कधी पूर्ववत होईल. आम्ही आता परतही जाऊ शकत नाहीये…कारण, तसा मार्गच नाहीये. जर कोणी विरुद्ध दिशेने मागे जात असाल, तर पुढे काय झालंय हे मला सांगा, किंवा आमच्यासारख्या प्रवाशांची मदत करा. एकाच ठिकाणी ५ तासांपासून अडकणं हे अतिशय भितीदायक आहे.”
सोनालीच्या व्हिडीओवर अभिनेत्री गौतमी देशपांडेने सुद्धा कमेंट करत “मी सुद्धा याच वाहतूक कोंडीत अडकलेय, काळजी घ्या” असं म्हटलं आहे. याशिवाय फुलवा खामकर सुद्धा याच वाहतूक कोंडीत अडकली होती. यावर नेटकऱ्यांनी सुद्धा असंख्य कमेंट्स करत या वाहतूक कोंडीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. “५ तास लोकांना रस्त्यावर अडकवणं लाजिरवाणं आहे.. जनता त्रास सहन करतेय”, “पुढे क्रेन पडल्यामुळे हे झालंय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
