Sonali Kulkarni Supports Vidyanand Bapat: गणेशोत्सवातील वाढते ध्वनीप्रदूषण, डीजे आणि लाऊडस्पीकर विरोधात आपली रोखठोक भूमिका मांडणारे विद्यानंद बापट सध्या राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. बापटांनी डीजे विरोधात आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्यावर त्यांच्यावर पुण्यातील टिळक रोड परिसरात काही अज्ञातांनी हल्ला देखील केला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. पण, यानंतरही विद्यानंद बापट यांनी त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या विचारांना पाठिंबा देणारे अनेक लोक आता पुढे आले आहेत. याशिवाय त्यांना मराठी मनोरंजनविश्वातून सुद्धा पाठिंबा मिळत आहे.

आरती सोलंकीने पोस्ट शेअर करत तर, प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्तेने बापटांवर खास गाणं तयार करत त्यांना पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळालं. आता या पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विद्यानंद बापट यांच्यासाठी पोस्ट शेअर करत त्यांना शाबासकी दिली आहे.

सोनाली कुलकर्णी लिहिते, “प्रिय विद्यानंद बापट…मनापासून आभार आणि शाबासकी…जागरूक नागरिक असण्याची व्याख्या नव्यानं मांडत आहेस.. अत्यंत स्पष्ट विचार… संयत, मुद्देसूद भाषा.. अविचल ठामपणा.. तुझ्या या वागण्याचा प्रचंड अभिमान वाटतो आहे. त्याचबरोबर तुझी दमछाक होऊ नये, याची काळजी वाटते आहे..सगळीच शहरं खडबडून जागी झाली आहेत.. तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं आहे..” या पोस्टच्या शेवट सोनालीने “तुम्हाला आणखी बळ मिळो” असं म्हणत आज ५ सप्टेंबर निमित्त त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनालीने पोस्ट शेअर करत बापटांना पाठिंबा दिल्यामुळे नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसतोय. तर, काही नेटकऱ्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत त्यांना ट्रोलही केलं आहे. या सर्व घटनांनंतरही डीजेच्या विरोधात लढत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकप्रिय गायक अवधूत गुप्तेने सुद्धा विद्यानंद बापटांच्या समर्थनात खास गाणं तयार केलं आहे. या गाण्याचे बोल आहेत, “स्वच्छ विचार अन् स्वच्छ वाणीव…हसणाऱ्या माकडांचा…मंगल असला…पवित्र असला…तरीही देश हा दगडांचा….तुझ्यासारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा…विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा” हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.