South Actor Wanted To Work In Marathi Movie : मराठी सिनेमांचं आणि मराठी कलाकारांचं अनेकदा इतर भाषिक प्रेक्षक आणि कलाकारांकडून कौतुक होत असतं. आज अनेक मराठी कलाकार हिंदी सिनेमा आणि सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम केल्यानंतर मराठी प्रेक्षक हिंदी प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवतात. तसंच इतर भाषिक कलाकारसुद्धा मराठीत काम करण्यासाठी उत्सुक आहेत, यापैकीच एक अभिनेता म्हणजे विजय सेतुपती.

’96’मधील हळवा प्रेमी असो, ‘सुपर डिलक्स’मधील ट्रान्सजेंडरची आव्हानात्मक भूमिका असो किंवा ‘विक्रम वेदा’मधील खतरनाक गँगस्टर असो. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना कायमच आश्चर्यचकीत करणारा अभिनेता म्हणजे विजय सेतुपती. दाक्षिणात्य सिनेमांसह त्याने हिंदी सिनेमे आणि सीरिजमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केल्यानंतर आता विजयला मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा आहे आणि ही इच्छा त्याने नुकतीच व्यक्त केली.

एबीपी माझाच्या माझा कट्टावर विजय सेतुपती मराठी सिनेमांत काम करण्याविषयी म्हणाला, “सिद्धार्थ जाधव आणि किशोर यांचं आपल्या मराठी इंडस्ट्रीवर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या कामातून हे प्रेम कायम दिसून येतं. मराठी इंडस्ट्रीने बिग प्रोजेक्ट्स तयार करायला हवे. मलादेखील मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा आहे. मी जेव्हा यांच्याबरोबर काम करत होतो, तेव्हा मी यांना मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली.”

यापुढे विजय म्हणाला, मराठीत आणखी मोठमोठे सिनेमे बनले पाहिजेत आणि मलाही मराठी इंडस्ट्रीत काम करायचं आहे. मी त्यांना तसं सांगितलं आहे. मी जास्त चित्रपट पाहिले नाहीत त्यामुळे कोण कोण चांगले दिग्दर्शक आहेत ते मला सांगा त्यांच्याकडून मी स्क्रिप्ट ऐकायला नक्कीच तयार आहे. मी मराठी बोलायचाही प्रयत्न करेन.” आता विजयला मराठी सिनेमात कास्ट कोण करणार, याची त्याच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता आहे.

दरम्यान, विजयचा नुकताच एक मुकपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे, ‘गांधी टॉक्स’. या चित्रपटात विजय सेतुपतीसह अरविंद स्वामी, अदिती राव हैदरी, सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, वनिता खरात, उषा नाडकर्णी असे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. किशोर बेळेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र रिलीज झाला आहे.