मराठी कलाकार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवित असताना, दाक्षिणात्य कलाकारांची सुद्धा मराठी चित्रपटात दमदार एन्ट्री होत आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेते रवी प्रकाश ‘दशमी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. आपल्या पहिल्याच चित्रपटात ते डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, मराठीत पदार्पण करताना त्यांनी ‘एसीपी आसिफ मुजावर’ ही रुबाबदार व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाचा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

रहस्य, थरार आणि सामाजिक वास्तवाचा वेध घेणाऱ्या ‘दशमी’ चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटात महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन अशा दमदार कलाकारांची मांदियाळी आहे.

आपल्या मराठी पदार्पणाबद्दल रवी प्रकाश म्हणतात, “मराठीत पहिल्यांदाच काम करताना अशी भूमिका मिळणं माझ्यासाठी खूप खास आहे. ‘एसीपी आसिफ मुजावर’ हे केवळ डॅशिंग पोलीस अधिकारी नाहीत, तर तपासाची सखोल माहिती असलेले निष्णात अधिकारी आहे. या भूमिकेसाठी माझ्याकडून खूप बारकाईने तयारी करून घेतली गेली. या भूमिकेतून मराठी प्रेक्षकांना माझी एक वेगळी बाजू पाहता येणार आहे, याचा आनंद आहे.”

डॅशिंग लूक, दमदार अंदाज आणि तपासातील बारकावे यामुळे एसीपी आसिफ मुजावर ही व्यक्तिरेखा ‘दशमी’च्या कथानकात महत्त्वाची ठरणार आहे.

याशिवाय या सिनेमात गौरी इंगवले आणि मकरंद अनासपुरे यांची जोडी बापलेकीच्या भूमिकेत झळकणार आहे. स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून मुलगी लक्ष्मीने डॉक्टर व्हावं, यासाठी तो बाप आयुष्यभर कष्ट करतो. लक्ष्मीही वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत, त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न स्वतःचं मानून जगणारी संवेदनशील मेडिकल स्टुडंट आहे. मुलीच्या स्वप्नांसाठी जगणाऱ्या प्रत्येक वडिलांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी ही गोष्ट आहे. विजयादशमीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याविषयी मकरंद अनासपुरे सांगतात, “प्रभाकर’ या भूमिकेतून एका वडिलांचं मुलीवरील प्रेम आणि तिच्यासाठीची धडपड अनुभवता आली. मुलीसमोर खंबीर राहूनही आतून तुटणारा प्रभाकर साकारतानाचा हा प्रवास मनाला भिडणारा होता.”