Spruha Joshi : मराठी सिनेविश्वातील बहुआयामी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. स्पृहाने अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासह कवयित्री, सूत्रसंचालक आणि लेखिका म्हणूनही ती तितकीच लोकप्रिय आहे. मनाला भिडणाऱ्या आणि भावनांचा हळूवार स्पर्श करणाऱ्या स्पृहाच्या कवितांना सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळतो. कला, साहित्य आणि अभिनय अशा सर्वच गुणांमध्ये नैपु्ण्य असणाऱ्या स्पृहामध्ये आणखी एक खास कलागुण दडलेला असून, त्याची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
स्पृहा जोशी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या चित्रपटांबाबत आणि नाटकांबाबत पोस्ट करत असते. या नाटकांना प्रेक्षकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद आणि त्यांच्या भावनाही स्पृहा शेअर करते. त्याचबरोबर तिने लिहिलेल्या कविता आणि गझल सादर करत असते. या कवितांच्या माध्यमातून स्पृहाचे व्यक्त होणे तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. स्पृहाच्या कवितांचा व अभिनयाचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. यासह स्पृहाला आणखी एक कला येते, ती म्हणजे विणकाम.
स्पृहाने विणकामाचा व्हिडीओ केला शेअर
अभिनेत्री स्पृहा जोशीला लोकरीचे विणकाम येते. कामामधून मिळणाऱ्या वेळेमध्ये स्पृहा तिचा हा छंद जपते. विणकामातून विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू तिने साकारल्या असून याची एक झलक तिने शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये स्पृहा अत्यंत मन लावून तिचे विणकाम करत असल्याचे दिसत आहे. यामधून तिने सुंदर पर्स, कि-चेन आणि स्वेटर विणले आहेत. स्पृहा जोशीला येणारी ही आणखी एक कला पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
विणकामाचा हा व्हिडीओ शेअर करताना स्पृहा जोशी हिने प्रेमाने आणि हाताने बनवलेल्या वस्तू असे खास कॅप्शन लिहित रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. त्यासह कलाकारांचा पहिला नियम – ‘आपल्या माणसांना आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तू द्यायच्या असतात,’ अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. स्पृहाच्या या विणकामाच्या व्हिडीओमध्ये तिने लोकरीचे स्वेटर, कानटोपी, लहान मुलांची कार्टून बॅग, कि-चेन तसेच पर्स अशा विविध वस्तू विणल्या आहेत. तिच्या प्रियजनांना गिफ्ट देताना तिने खास हाताने लिहिलेली नोटदेखील दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
अभिनयासह स्पृहा जोशीला येणारे विणकाम पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, ‘शिकवशील मला?..फार भारी बनवलं आहेस’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘खूप सुंदर’ अशी कमेंट केली आहे. आणखी एका चाहत्याने ‘हे खरे आहे,’ अशी कमेंट करत तिच्या कॅप्शनला दुजोरा दिला आहे. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या स्पृहा ‘सांगा कसं जगायचं’ या नाटकाचे प्रयोग करत आहे. तसेच ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ असे कवितांचे कार्यक्रम करत असते. यूट्यूब चॅनेल, कवितांचे कार्यक्रम आणि सूत्रसंचालन यांमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
