मालिकाविश्वात सक्रिय असलेले अनेक कलाकार येत्या काही दिवसांत रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री समृद्धी केळकर ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटात झळकणार असल्याचं नुकतंच प्रेक्षकांसमोर आलं आहे. आता या पाठोपाठ ‘स्टार प्रवाह’च्या आणखी एका नायिकेने प्रेक्षकांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये या अभिनेत्रीचा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘ती’ कोण आहे पाहुयात…
‘स्टार प्रवाह’वर नुकतीच ‘वचन दिले तू मला’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री अनुष्का सरकटे प्रमुख भूमिका साकारत आहे. सध्या ती या नव्या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. यादरम्यान, तिने सोशल मीडियावर तिच्या नव्या सिनेमाचं पोस्टर आणि यातील नव्या गाण्याची झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे. अनुष्कासह या सिनेमात अभिनेता आयुष संजीव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं.
छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता ‘जब्राट’ अशा रोमँटिक अंदाजात मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मालिकेनंतर ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार? याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. ‘जब्राट’ सिनेमात हे दोघं प्रिन्स आणि निशा या भूमिका साकारणार आहेत. नवीन वर्षात येत्या ६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील ‘तू आणि मी’ हे रोमँटिक गाणंही प्रदर्शित झालं आहे.
‘लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स’ असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला असणाऱ्या ‘जब्राट’ या संगीतमय चित्रपटात कॉलेज विश्वातल्या दुनियादारीची भावस्पर्शी गोष्ट पाहायला मिळेल. आयुष संजीव, अनुष्का सरकटे या जोडीसह या सिनेमात वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट, प्रगती कोळगे, संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, गणेश यादव हे कलाकार झळकणार आहेत.

दरम्यान, ‘जब्राट’ सिनेमा ६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
