वाळवी ही जशी उपद्रवी आहे तशीच ती उपयुक्तदेखील आहे हे आपण वाचलं आहे, ऐकलं आहे. पण हीच साधी गोष्ट एका सस्पेन्स मर्डर मिस्टरीमधून उलगडून सांगताना दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी प्रेक्षकाला आतपर्यंत पोखरून काढलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत आता नवीन काय पाहायला मिळणार? याचं उत्तर म्हणजे ‘वाळवी’ चित्रपट, पण दुर्दैवाने सवयीप्रमाणेच मराठी प्रेक्षक या चित्रपटाची म्हणावी तशी दखल घेणार नाही असंच एकूण चित्र सध्यातरी दिसत आहे.

मुळात मराठी चित्रपटात ‘डार्क ह्युमर’ या पठडीतले प्रयोग फार कमी झाले आहेत, किंवा झालेच नाहीयेत असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. हिंदीत अगदी ‘जाने भी दो यारों’पासून नुकत्याच आलेल्या ‘अंधाधूंन’, ‘डार्लिंग्स’पर्यंत चित्रपटांची ही भलीमोठी यादी मिळेल. मराठीत परेश मोकाशी यांनी नुकताच सादर केलेला हा ‘वाळवी’ मराठी चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल आणू शकतो, फक्त प्रेक्षकांनी तो तितका उचलून धरायला हवा. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’सारखे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक परेश मोकाशी आणि मधूगंधा कुलकर्णी यांनी त्यांच्या पोतडीतून काढलेला हा ‘वाळवी’ अगदी त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच सुटसुटीत आहे आणि त्यामुळेच तो सुसह्य वाटतो.

marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
do-you-know-who-is-this actress
फोटोमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही कमावतेय नाव
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

आणखी वाचा : “प्राण्यांवरच्या बायोपिकची सुरुवात माझ्यापासून…” सुबोध भावेने उडवली स्वत:चीच खिल्ली

मुळात या चित्रपटाची कथा अगदी साधी आहे, किंबहुना हा चित्रपट केवळ एका घटनाक्रमावर बेतलेला आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. ती घटना नेमकी काय आहे हे आपल्याला ट्रेलरमध्येच सांगितलं आहे, या घटनेमुळे गोष्टीतील ४ पात्रांच्या आयुष्यात नेमके कसे एकापाठोपाठ एक ट्विस्ट येतात आणि त्यातून ते सही सलामत बाहेर येतात की नाही याचं उत्तर आपल्याला या चित्रपटात मिळतं. चित्रपटातील ही चारही पात्रं आपल्यासारखीच गोंधळलेली आणि नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत आणि म्हणूनच अगदी गंभीर प्रसंगात सुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्याला हसू येतं. हीच खरी कमाल आहे डार्क ह्युमरची, आणि ते साध्य करण्यात परेश मोकाशी हे पूर्णपणे यशस्वी झाले आहेत.

एक नवरा आपल्या विवाहबाह्य संबंधाखातर आपल्या मानसिक संतुलन ढळलेल्या बायकोला मारायचा कट रचतो आणि त्यात अनाहूतपणे तो, त्याची प्रेयसी आणि एक मानसोपचारतज्ञ फसतात आणि पुढे जे काही घडतं ते आपण एंजॉय करत पाहतो आणि त्या घटनेचा शेवट जेव्हा होतो तेव्हा मात्र आपण आ वासून स्क्रीनकडे बघत बसतो. यापलीकडे याविषयी काही बोलणं या चित्रपटासाठी मारक ठरेल असं मला वाटतं. कथेमधल्या नवऱ्याची बायको करत असलेलं वाळवीवरील संशोधन आणि मनुष्याच्या मेंदूला लागलेली वाळवी ही कशी एखाद्याला पोखरून काढते आणि त्याचा अंत नेमका कसा होतो याचा बरोबर संबंध परेश यांनी चित्रपटात जोडला आहे.

चित्रपटातील पात्रांची पार्श्वभूमी मांडण्यात दिग्दर्शकाने वेळ घालवलेला नाही ही पाहिलं तर चांगली गोष्ट आहे आणि पाहिलं तर चुकीची आहे. माझ्यामते अशा चित्रपटात ती गोष्ट नसलेलीच बरी कारण मग प्रेक्षक प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क शोधायला सुरुवात करतात, जे अशा जॉनरच्या चित्रपटांसाठी योग्य नाही. बाकी संवाद, पार्श्वसंगीत, चित्रीकरण सगळंच उत्तम जमून आलं आहे. काही ठिकाणी बारीक चुका आढळून येतात पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर या चित्रपटाचा उत्तम आस्वाद घेता येऊ शकतो. स्वप्नील जोशी, अनीता दाते, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे यांची कामं चोख झाली आहेत.

‘वाळवी’ पाहिल्यावर मराठी मनोरंजनसृष्टी ‘सैराट’ ते ‘वेड’ किंवा तद्दन ऐतिहासिक चित्रपटांच्या कोशातून बाहेर यायचा प्रयत्न करत आहे असं प्रकर्षाने जाणवतं. आता फक्त याला सुजाण आणि बॉक्स ऑफिसवर गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांची जोड मिळाली तर असे प्रयोग मराठीत आणखी होतील असं मला वाटतं. ज्यांना असे चित्रपट आवडतात त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा, पण “मराठी चित्रपट चालत नाहीत हो..” अशी बोंब ठोकणाऱ्या प्रेक्षकांनी तर हा ‘वाळवी’ पाहायलाच हवा.