अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. सध्या तो त्याच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. नुकताच त्याने त्याच्या तुकाराम या हिंदी चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला. तर आता तो ‘फणस’ नावाचा चित्रपट घेऊन येणार का, यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
सुबोध भावेने नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली होती. तर याच पुरस्कार सोहळ्यात अंकिता वालावलकर या लोकप्रिय कंटेंट क्रिएटरशी मजेशीर संवाद साधला. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला त्याचा ‘हापूस’ हा चित्रपट खूप गाजला. तर त्या यशानंतर आता तो ‘फणस’ चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार का? असं तिने सुबोधला गमतीत विचारलं. यावर सुबोधनेही अतिशय गमतीशीर उत्तर दिलं.
सुबोध म्हणाला, “आम्ही सातत्याने काही ना काही नवीन प्रयत्न करत असतो. हापूसची परंपरा तोडून आम्ही आमच्या चित्रपटात हापूस खूप मोठ्या आकाराचा दाखवला होता. तर आम्ही फणस या चित्रपटात फणसाची परंपरा मोडून त्याचा आकार अगदी लहान दाखवणार आहोत, बोरांसारखा. रेडी टू इट आणि खिशात घालून पटकन त्यातला छोटासा गरा काढून खाता येईल एवढाच फणस आम्ही आता घेऊन येत आहोत.”
हेही वाचा : “आता शांत बसणार नाही कारण…” होणाऱ्या ट्रोलिंगबाबत सुबोध भावेची रोखठोक भूमिका
अर्थातच तो असा कुठलाही चित्रपट घेऊन येत नाहीये. हे उत्तर त्याने गमतीत दिलं आहे. परंतु आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून सुबोधचा हा मजेदार अंदाज त्याच्या चाहत्यांना आवडला आहे.