Subodh Bhave Reacts on Student Protest : NEET पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने २० जुलै रोजी काढलेल्या संसदेवरील मोर्चाला हिंसक वळण लागलं. दिल्लीतील या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे पडसाद आता संपूर्ण देशात उमटत आहेत. या घटनेवर प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. “आंदोलन करणारे तरुण आणि काठ्या चालवणारे हे दोन्ही याच देशाचे आहेत. भारतीयांना एकमेकांशी झुंजताना पाहणे सुखावह नाही,” असं सांगत त्याने राज्यकर्त्यांना संवेदनशीलतेने संवाद साधण्याची विनंती केली आहे. सुबोधच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत.
आंदोलन करणारे व त्यांच्यावर काठ्या चालवणारे याच देशाचे आहेत. भारतीयांना एकमेकांशी झुंजताना पाहणं ही चांगली गोष्ट नक्कीच नाही, शरीरावर झालेल्या जखमा भरून येतील, पण मनावरील जखमा खोल जाण्याआधी संवाद व्हावा, असं सुबोध भावेने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय.
“संवाद –
तो नसतो तेव्हा विसंवाद सुरू होतो.
आंदोलन करणारे तरुण ही याच देशाचे आहेत आणि काठ्या चालवणारे ही.
निर्णय घेणारे ही याच देशाचे आहेत आणि भरडले जाणारे ही.
हा प्रश्न या देशातील स्वप्नं बघणार्या लाखो तरुणांच्या किंबहुना आपल्याच देशाच्या भविष्याचा आहे.
ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची क्षमता आणि अधिकार आहेत त्यांनी संवेदनशील होऊन निर्णय घ्यावा हीच विनंती आणि ईच्छा.
भारतीय एकमेकांशी झुंजताना पाहणे ही काही फार सुखावह गोष्ट नक्कीच नाही.
शरीरावर झालेल्या जखमा भरून येतील, पण मनावर झालेल्या जखमा खोल जाण्याआधी संवाद घडो हीच प्रार्थना
जय हिंद
फक्त एक भारतीय नागरिक,” अशी पोस्ट सुबोध भावेने फेसबुकवर केली आहे.
‘सर्व मराठी अभिनेते आणि अभिनेत्री यांनी व्यक्त होणे गरजेचे आहे. सुबोध सर, अभिनेता म्हणून चांगले आहातच पण भारतीय व्यक्ती म्हणूनही चांगले आहात,’ ‘मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत… संवादच देशाला जोडून ठेवतो. मनापासून सहमत!’, ‘स्वतःच्या मंत्रिमंडळाचा ते कधी सल्ला घेत नाहीत…. देश हुकूमशाहीकडे चालला आहे’, ‘कुठेतरी हा आपल्या पिढीचा दोष आहे की आपण गोष्टी या लेव्हलला येईपर्यंत सहन केल्या आहेत… आणि त्याची फळं ही पिढी भोगते आहे.. की त्यांना शांतता पूर्ण आंदोलन करून सुद्धा लाथांनी तुडवलं गेलं… वाईट आहे हे सगळं.. संवाद केला असता तर एवढी वेळ आलीच नसती.. पण तोच तर जमत नाही ना आजच्या सरकारला,’ ‘सुबोध सर तुम्ही प्रतिक्रिया दिलीत हेच खुप आहे. एकदा फक्त एकदा ज्या २१ मुलांनी पेपरफुटीमुळे आत्महत्या केल्या त्यांच्या आईवडीलांचा विचार जर प्रत्यकाने केला तर नक्कीच याची गंभीरता सर्वांच्या लक्षात येईल,’ ‘तुम्ही सल्ला दिलात…चला तुम्ही देशद्रोही झालात,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सुबोध भावेच्या या पोस्टवर केल्या आहेत.
