"माझ्या करिअरचा बोर्डगेम..."; सुबोध भावेची 'ती' पोस्ट चर्चेत | Subodh bhave shared a special post for his fans | Loksatta

Video : “माझ्या करिअरचा बोर्डगेम…”; सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सुबोध आश्चर्यचकित झाल्याचं दिसत आहे.

Video : “माझ्या करिअरचा बोर्डगेम…”; सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून तो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. विविध माध्यमातून चाहते त्याच्याबद्दल त्यांना वाटणारं प्रेम व्यक्त करत असतात. आता सुबोधने त्याच्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

गेल्याच महिन्यात सुबोधचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या फॅनक्लबने त्याला एक खास भेट दिली आहे. त्यांनी सुबोधच्या करिअरवर आधारित एक खेळ तयार करून त्याला पाठवला. तो पाहून सुबोध आश्चर्यचकित झाल्याचं दिसत आहे. हे गिफ्ट उघडून बघतानाचा एक व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने लिहीलं, “वेडी माणसं….दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझा फॅनक्लब काहीतरी विलक्षण भेट पाठवत असतो. त्या सुंदर अशा भेटीसाठी अप्रतिम कल्पना निवडतो आणि पूर्ण करायला प्रचंड मेहेनत घेतो. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान वेळ मला भेट देता यावी म्हणून कारणी लावतो. या वर्षीची भेट सुध्दा तितकीच विलक्षण आहे.”

आणखी वाचा :‘कट्यार काळजात घुसली’ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी

पुढे तो म्हणाला, “व्यापार खेळ असतो तसा त्यांनी माझ्या आत्तापर्यंतच्या कलेच्या प्रवासातले टप्पे निवडून त्याचा एक बैठा खेळ बनवलाय. त्यात मी काम केलेले विविध चित्रपट, मालिका, नाटकं आहेत. सोंगट्या आहेत,पैसे आहेत, फासे आहेत आणि खेळाचे नियम सुध्दा आहेत. त्याचबरोबर एक पोस्टपेटी आहे, त्यांच्या पत्रांनी भरलेली.”

हेही वाचा : “कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

“काय बोलू??????? निशब्द!!!!!!!! खरं म्हणजे आत्ता माझ्या डोळ्यासमोर माझे सर्व निर्माते, दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार आणि पडद्यामागचे कलाकार सर्व आले.त्यांच्यामुळे मला चांगल्या भूमिका मिळाल्या आणि त्यामुळे दृष्ट लागेल असा fanclub मिळाला. माझ्या fanclub मधील सर्वांना मनापासून धन्यवाद इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल. तुम्हा सर्वांवर नितांत प्रेम! तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. (आता आम्ही सगळे एकत्र बसून तुम्ही दिलेला हा माझ्या करिअरचा boardgame खेळू)” असं म्हणून सुबोधने आभार व्यक्त केले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 10:48 IST
Next Story
अनिल कपूर यांची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, ट्वीट करत म्हणाले…