लहानपणी आपण ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही कथा नक्कीच ऐकली असेल. मात्र, आता याच नावाचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे.

येत्या २९ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यासारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. : नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे. नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजित परब यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून वैभव जोशी यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली आहे.

हेही वाचा- “इतकी वर्षे एकत्र ..”; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वंदना गुप्तेंनी शेअर केला ५१ वर्षांपूर्वीचा जुना फोटो, म्हणाल्या….

अभिनेत्री मुक्ता बर्वेने ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाचा टीझर आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रेक्षकांकडून या टीझरला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या हटक्या नावानेच प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाच्या कथेबाबत उत्सुक्ता निर्माण झाली आहे. विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळीशीतील चोरांनी केला आहे. त्यामुळे विवाहित असणे गुन्हा आहे का? आणि हे नेमके काय प्रकरण आहे? तुम्हाला पडलेल्या या प्रश्नांची उत्तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार आहे.