माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयासह तिने तिच्या नृत्याने व सौंदर्यानेही अनेकांची पसंती मिळवली. फक्त प्रेक्षकच नाही तर कलाकार मंडळीही तिचे चाहते आहेत आणि अनेकदा तिच्याबरोबर काम करण्याच्या संधीच्या शोधात असतात. अशातच आता लोकप्रिय अभिनेता सुमीत राघवननेही माधुरीसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

सुमीत राघवनने मराठी, हिंदी व गुजराती अशा अनेक भाषेतील कलाकृतींमध्ये काम केलं आहे. विशेषकरुन मराठी व हिंदीत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच आता त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्याने माधुरीसह काम करण्याचा अनुभव सांगत तिचं कौतुक केलं आहे.

माधुरीबद्दल काय म्हणाला सुमीत राघवन?

सुमीत राघवनने माधुरी दीक्षितसह ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटात काम केलं होतं. त्याने तिच्या ऑनस्क्रीन नवऱ्याची भूमिका साकारली होती. अशातच आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे. माधुरीबरोबरच्या या चित्रपटाबद्दल विचारल्यानंतर सुमीत म्हणाला, “तो खूप चांगला चित्रपट मला मिळाला. तेजस देवस्कर माझा मित्र आहे. आम्ही एकाच जिममध्ये वर्क आऊट करायचो. तो म्हणाला सुमीत दादा एक चित्रपट आहे, मी दिग्दर्शन करत आहे. माधुरी दीक्षित त्यात असणार आहे. मी चकीत होत म्हणालो माधुरी… मग ती कोण असणार आहे माझी. तो म्हणाला जोडीदार. मी म्हटलं मी करतो. तो म्हणाला कथा ऐका मी न ऐकताच म्हटलं मला आवडलीये गोष्ट.”

सुमीत याबद्दल पुढे म्हणाला, “पण तो चित्रपट करताना मजा आली. हे लोक का इतके मोठे आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली. आजही तितकीच मेहनत घेण्याची तयारी, चिकाटी, आवड आहे. दिग्दर्शक मोठा असतो. त्यामुळे तिने त्याला काही सुचवलं आणि तो जर म्हणाला की माधुरी मॅम नको तर ती ओके ठिके असं म्हणते. त्या चित्रपटातलं एक रोमँटिक गाणं करतानाही मजा आली.”

दरम्यान, तेजस देवस्कर यांनी ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. माधुरी दीक्षित यामध्ये मुख्य भूमिकेत होती आणि हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट होता. सध्या माधुरी ‘कोण होणार करोडपती’ या शोमुळे चर्चेत आहे. माधुरी या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्यांदाच ती कुठल्या तरी शोचं त्यात मराठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहतेही उत्सुक आहेत.