Sumeet Raghavan Mumbai House Tour Details: सुमीत राघवनने नुकतीच आपल्या मुंबईतील घराची झलक दाखवली आहे. सुमीतने दोन फ्लॅट एकत्र करून आपलं हे घर तयार केलंय. मुंबईतील घरं फार लहान असतात. त्यामुळे मुंबईकरांना छोट्या बाल्कनीवरच भागवावं लागतं, कारण इथे फक्त पाऊल ठेवण्याइतक्या जागेसाठीही तब्बल १ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, असं सुमीत राघवनने सांगितलं.
‘मॅशेबल इंडिया’शी बोलताना सुमीतने घराबद्दल माहिती दिली. “हे दोन फ्लॅट आहेत. मी एक 2BHK आणि एक 1BHK एकत्र करून हे घर बनवलंय.” सुमीतने आपल्या घराला अत्यंत साधा पण आकर्षक लूक दिला आहे. त्याच्या घराच्या भिंतीवर बदामी आणि हिरव्या रंगाच्या छटा आहेत.
लिव्हिंग रूममध्ये टेराकोटा रंगाचा सोफा आणि त्यावरील पांढऱ्या नक्षीचे कुशन्स खोलीच्या सौंदर्यात भर घालतात. इथे एका कोपऱ्यात सुमीतचे पुरस्कार ठेवले आहेत.

भिंतीवर संविधान ते बाबासाहेबांसाठी खास जागा
सुमीतच्या घरातील एका भिंतीवर पुरस्कारांबरोबरच भारतीय संविधानाची प्रत मध्यभागी ठेवण्यात आली आहे. “देश चालवण्यात संविधानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, त्यामुळे आपल्या देशाचे संविधान घरात असणे आवश्यक आहे, यावर माझा आणि माझ्या कुटुंबाचा विश्वास आहे,” असं सुमीतने सांगितलं. सुमीतच्या घरात एक खास जागा आहे, जी बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आहे.

चिन्मयी सुमीतच्या भावाने डिझाइन केलंय घर
लिव्हिंग रूमजवळच डायनिंग एरिया आहे. तिथे कोपऱ्यात छोटेसे मंदिर आहे. सुमीतचे आई-वडील याच इमारतीत राहतात आणि बरेचदा सगळे सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण एकत्र करतात. सुमीतचं घर त्याची पत्नी चिन्मयीचे भाऊ विजय मुन्शी यांनी डिझाइन केलंय. मंदिराकडे इशारा करत सुमीत म्हणाला, “आम्ही खूप आध्यात्मिक लोक आहोत. आम्ही सर्व सण अतिशय उत्साहात साजरे करतो.”

डायनिंग एरियाच्या जवळच स्वयंपाकघर आहे. सुमीतने किचनची सफर घडवून आणली. सुमीतला स्वयंपाकाची आवड असल्याने किचनमध्ये खूप वेळ घालवतो. “मला स्वयंपाक करायला आवडतं, त्यामुळे मी इथे खूप वेळ घालवतो. माझं शूटिंग नसेल तेव्हा मी काहीतरी खास बनवावं अशी माझ्या मुलांची अपेक्षा असते. नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी मी अनेकदा कुकिंग क्लासेसही करतो,” असं सुमीतने सांगितलं.

हे दोन्ही फ्लॅट्स एका पॅसेजने जोडले आहेत. त्या पॅसेजमध्ये पेंटिंग्स आणि लहान रोपट्यांनी सजावट केली आहे. येथील भिंती हिरव्या रंगाच्या आहेत.
घरात एक खास म्युझिक रूम देखील आहे. इथे सुमीत राघवन कधीकधी पेटी वाजवत गायनाचा सराव करतो. मात्र, या खोलीचा वापर त्याचा मुलगा नीरद जास्त करतो, कारण तो संगीत दिग्दर्शक आहे. ही म्युझिक रूम या फ्लॅटचे किचन होते, पण आता तिथे पियानो, युकुलेले, गिटार, हार्मोनियम आणि इतर अनेक वाद्ये ठेवली आहेत. याच खोलीत त्यांच्या पाळीव श्वानाच्या पंजांचे ठसे फ्रेम करून ठेवले आहेत.

“माझे घर म्हणजे दोन फ्लॅट्स आहेत. डायनिंग टेबल होतं तो 1BHK आहे, आणि जिथे म्युझिक रूम आहे तो 2BHK आहे.”
मास्टर बेडरूम आणि बाल्कनी
सुमीतची मास्टर बेडरुम खूप मोठी नसली तरी, एका भिंतीवर लावलेल्या मोठ्या चित्रामुळे खोली मोठी असल्यासारखं वाटतं. बेडरूममध्ये एक बेड आहे. तसेच या खोलीला एक सुंदर बाल्कनी आहे. बाल्कनीत दोन खुर्च्या, एक छोटे टेबल आणि काही रोपटी आहेत. संध्याकाळच्या चहासाठी ही अगदी उत्तम जागा आहे.

बाल्कनीकडे इशारा करत सुमीत म्हणाला, “आमच्यासारख्या मुंबईकरांसाठी हीच आमची बाग आहे. दिल्ली किंवा उत्तर भारतातून येणाऱ्या लोकांना त्यांच्याकडील प्रशस्त जागेचा अभिमान असतो, पण आमच्याकडे जे आहे त्याच छोट्या जागेत आनंद शोधावा लागतो. इथे जागा इतकी कमी आहे की फक्त पाऊल ठेवण्याइतक्या जागेसाठीही १ लाख रुपये लागतात. हे खूप महाग आहे.”

बाल्कनीत अनेक रोपटी आहेत. त्यातील एक रोप त्यांच्या ‘रिक’ नावाच्या मांजराला समर्पित आहे. या मांजराचा २०२३ मध्ये मृत्यू झाला होता. “त्याच्या अस्थी या कुंडीतील मातीत आहेत. जेव्हा जेव्हा या झाडाला फुलं येतात, तेव्हा त्याच्या सुवासाने आम्हाला रिकची आठवण येते,” असं सुमीतने सांगितलं.
बेडरूममध्ये पुस्तकांसाठी एक कपटा आहे. “माझ्या पत्नीला वाचायला खूप आवडतं,” असं सुमीतने सांगितलं.
मुलांच्या बेडरूममध्येही मर्यादित जागेचा अतिशय योग्य वापर केला आहे. बेड, अभ्यासाचे टेबल आणि पुस्तकांचे कपाट या खोलीत आहे. या खोलीलाही बाल्कनी आहे. प्रत्येक खोलीत बाल्कनी असल्यानेच आम्ही हे घर घेतलं होतं.

“प्रत्येक खोलीला बाल्कनी असल्याने मी हे घर घेतलं. बाल्कनी लहान आहे, पण दोन जणांना उभे राहण्यासाठी पुरेशी आहे. काही लोक या बाल्कनी बंद करून खोली मोठी करतात, पण आम्ही ती आहे तशीच ठेवली,” असं सुमीतने सांगितलं.
मुलांच्या खोलीत तपकिरी भिंतीबरोबर पांढऱ्या नक्षीचे पडदे वापरण्यात आले आहेत, ज्यामुळे एक सुंदर कॉन्ट्रास्ट लूक तयार होतो.
“आजकालच्या मुलांना घर खरेदी करणं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट वाटते. कारण ते पैसे इतरत्र गुंतवून त्यातून उत्पन्न मिळवता येतं, त्यामुळे घर घेण्यात इतके पैसे का वाया घालवायचे, असा विचार ते करतात. पण माझ्यासाठी घर असणं खूप महत्त्वाचं आहे. एक अभिनेता म्हणून तुम्हाला सतत प्रवास करावा लागतो आणि अनेकदा घराची आठवण येते. आम्हाला आमचा बेड, आमचा कोपरा आणि आमचं घर आठवतं. मला वाटतं की, स्वतःच्या घराबद्दल इतका जिव्हाळा असलेली किंवा स्वतःचं घर असावं अशी इच्छा असणारी आमचीच शेवटची पिढी आहे,” असं सुमीत राघवन म्हणाला.
