Sunil Tawade Daughter Ankita Marriage Story : मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे सुनील तावडे. सुनील तावडे यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा शुभंकर तावडेही या इंडस्ट्रीत आला आणि सध्या तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शुभंकरबरोबरच त्यांना एक मुलगीदेखील आहे.

सुनील तावडे यांची लेक अंकिता हिचं काही २०२३ मध्ये लग्न झालं. या लग्नाआधीच ती सासरी जाऊन राहिली होती. यामागे एक कारण होतं आणि या कारणाबद्दल सुनील तावडे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ते नेमकं काय म्हणाले? चला जाणून घेऊ…

लग्नाआधीच सुनील तावडेंची मुलगी सासरी राहायला गेली होती कारण…

आरपारशी साधलेल्या संवादात सुनील तावडे म्हणाले, “माझ्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या मुलीची आई खूप आजारी होती. त्यावेळी माझी मुलगी लग्नाआधी त्याच्याकडे जाऊन राहिली होती. यासाठी माझी आणि माझ्या पत्नीची परवानगी होती. कारण ती काहीतरी चांगलंच करण्यासाठी तिकडे जात होती. माझ्या मुलीला त्याच मुलाशी लग्न करायचं होतं. माझा माझ्या जावयावर आणि मुलीवर पूर्ण विश्वास होता. माझ्या मुलीने तेव्हा तिच्या होणाऱ्या सासूची आजारपणात पूर्ण सेवा केली.”

Award Banner

“सासू माझ्या मुलीला त्यांची मुलगीच मानायला लागली होती आणि इकडे माझी बायकोसुद्धा जावयाला मुलगा मानायला लागली. दोन्ही कुटुंबात एक खूप घट्ट नातं तयार झालं आणि हे फक्त यामुळेच शक्य झालं, कारण माझ्या मुलीने तिथे जाऊन सासूची सेवा केली होती. आता लग्न होणार आहे, म्हणून आपण हे करू या विचाराने तिने काही केलं नाही. तिला मनापासून वाटलं म्हणूनच ती लग्नाआधी सासरी राहायला गेली.”

“मला माझ्या संस्कारांवर आणि त्यापेक्षा अधिक माझ्या मुलीवर विश्वास”

यानंतर सुनील तावडे म्हणाले, “मला माझ्या संस्कारांवर आणि त्यापेक्षा अधिक माझ्या मुलीवर विश्वास आहे. माझी मुलगी अगदी खरी आहे. ती अजिबातच खोटेपणा करत नाही. त्यामुळे माझ्यावर तिचा विश्वास आहे, तिला काही वाटलं तर ती ते खरेपणाने सांगते. एकवेळ मी खोटं बोलेन; पण ती बोलणार नाही. माझी मुलगी मला जास्त ओळखते. हाच विश्वास असल्यामुळे मी तिला लग्नाआधी सासरी जा म्हटलं होतं. मोठा निर्णय होता, पण तेव्हा ते वाटलं नाही. कारण तेव्हा माझ्या मुलीचा विचार चांगला होता. ती काही मजा म्हणून तिकडे जात नव्हती. सासू आजारी होती; म्हणून तिने तो निर्णय घेतला होता. त्या घरी कुणी बाई नव्हती, त्यामुळेच तेव्हा गरज म्हणून माझी मुलगी तिथे गेली होती. तेव्हा माझ्या मुलीचं तिथे असणं गरजेचं होतं.”

“मी माझ्या आयुष्याकडे बघतो, त्यातून मुलाने शिकावं असं मला वाटतं”

यानंतर सुनील तावडे त्यांचा मुलगा शुभंकरबद्दलसुद्धा बोलले. त्याच्यावर मुलीपेक्षा नियम आहेत. याबद्दल ते म्हणाले, “मुलाला काही नियम लावण्यामागचं कारण त्याच्या लग्नानंतर घरात येणारी मुलगी ही महत्त्वाची व्यक्ती असणार आहे. ज्या मुलीवर पूर्ण घर अवलंबून आहे. शुभंकरचं करिअर, आमच्या घरचं वातावरण ते येणाऱ्या मुलीवर अबलंबून आहे. त्यामुळेच माझं लक्ष जास्त मुलावर आहे. मुलीबद्दल मला सगळं माहीत होतं. ती १२वीत असल्यापासून नोकरी करत आहे. अनेक ठिकाणी काम केल्याने ती खूप लवकर हुशार झाली. पण मी जेव्हा माझ्या आयुष्याकडे बघतो, तेव्हा त्यातून मुलाने शिकावं असं मला वाटतं. मी ज्या काही चुका केल्या त्या मुलाकडून होऊ नये असं मला वाटतं. त्याने नवीन चुका केल्या तर चालेल. हे सगळं त्याची आई त्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजावते. त्यामुळे त्याला काही सांगायचं असेल, तर मी बायकोला सांगतो आणि मग ती त्याला सांगते. पण हे शक्यतो सर्वांच्याच घरात असतं. मुलगा आईच्या अधिक जवळ असतो आणि मुलगी वडिलांच्या. तेच आमच्या घरातदेखील आहे.”