‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपट असो किंवा ‘माझा होशील ना’सारखी मालिका…प्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांनी प्रत्येक माध्यमांत कायमच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिकांसह काही गंभीर भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. सुनील तावडेंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर १९८७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या पत्नीचं नाव आहे सोनाली तावडे. त्यांच्या लग्नाला अलीकडेच ३८ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सुनील तावडेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

सुनील तावडे ‘आरपार’ युट्यूब चॅनेलची संवाद साधताना म्हणाले, “सोनालीला भेटण्यापूर्वी माझा आधी एक घटस्फोट झाला होता. जेव्हा घटस्फोट घ्यायचं निश्चित झालं…त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास चार वर्ष लागली. आता तेव्हा काय करायचं हे मला कळत नव्हतं. कारण, घटस्फोट मिळत नव्हता आणि आयुष्य असंच पुढे सुरू होतं. त्यादरम्यान एक एकांकिका सुरू होती. तिथे ऑडिशनसाठी एक मुलगी तिच्या कुटुंबीयांबरोबर आली होती. आता तेव्हाच्या काळात जरा व्यवस्थित काम करता आलं की लगेच सिलेक्ट करायचे. ती मुलगी एकांकिका करण्यासाठी ‘ओके’ म्हणाली…म्हटलं चला आता कॉफी प्यायला जाऊयात.” ही नाटकाच्या ऑडिशनसाठी आलेली मुलगी म्हणजेच सुनील तावडे यांच्या पत्नी सोनाली. इथेच या दोघांची पहिली भेट झाली होती.

“कॉफी प्यायला गेल्यावर तिच्या वडिलांशी आणि आता जो माझा मेहुणा आहे…म्हणजे तिच्या भावाशी मी खूप गप्पा मारल्या. विशेषत: तिचे वडील इतके विनोदी होते…मला खरंच त्यांच्याशी गप्पा मारून खूपच भारी वाटलं होतं. ते सुद्धा नकलाकार होते…गप्पागोष्टी करताना अनेक संदर्भ समजले, आपआपसांत छान ओळख झाली. त्यादिवशी मी घरी जाऊन सांगितलं होतं की, आज मी आयुष्यात खूप छान लोकांना भेटलोय. तर, सांगायचा मुद्दा असा की…तिचे वडील मला आधी आवडले, त्यानंतर मग मुलगी ( सोनाली ) आवडली.”

Award Banner

लग्नाआधी तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या…

सुनील तावडे पुढे म्हणाले, “हळुहळू तिलाही समजलं हा आपल्या प्रेमात आहे. मग, मी तिला सगळ्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या. आताची मुलं जशी सगळं थेट जाऊन आई-बाबांना सांगतात…आधी असं नव्हतं. तिच्या घरच्यांसमोर माझं इम्प्रेशन पडलं पाहिजे यासाठी मी त्यांना अनेकदा मदत केली. त्यावेळीच दुसऱ्या बाजूला माझी घटस्फोटाची केस सुद्धा सुरू होती…तेव्हा मग मी जे काही खरंय ते तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. तिलाही हे सगळं समजल्यावर थोडा धक्का बसला होता. मग, मी तिला नीट सगळ्या गोष्टी सांगितल्या.”

“आता सुरुवातीला मी सगळ्या गोष्टी सोनालीला सांगितल्या…त्यानंतर मग तिने तिच्या घरी कल्पना दिली. आश्चर्य म्हणजे…तिच्या घरचे म्हणाले, ‘ठिके काहीच हरकत नाही’ जर तुझ्या बाबतीत असं घडलं असतं तर? त्यांचं घर खरंच खूप छान होतं. त्यांच्या घरात १४ लोक राहत होते…एकत्र कुटुंबात ती लहानाची मोठी झाली होती…म्हणूनच मी सुद्धा सोनालीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण, ती पुढे जाऊन माझ्याही कुटुंबात अशाचप्रकारे मिळून मिसळून राहील. माझ्यापेक्षा ती वयाने खूप लहान होती. आम्हा दोघांमध्ये ११ वर्षांचं अंतर आहे. माझी पत्नी २१ वर्षांची असताना आमच्या मुलीचा जन्म झाला. या सगळ्यात सुद्धा एक गोष्ट आवर्जून सांगेन…माणसाला एकदा ठेच लागली की माणूस जास्त शहाणा होतो. माझ्या आत्याने सुद्धा लग्नाच्या बाबतीत नीट विचार करून निर्णय घे असं मला सांगितलं होतं. मग, त्यानंतर मी लग्न करताना भरपूर विचार करून निर्णय घेतला होता.” असं सुनील तावडेंनी यावेळी सांगितलं.