ZEE5 Super Duperr Movie OTT Release Date : यंदाच्या वर्षात आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यापैकीच एक म्हणजेच ‘सुपर डुपर’ सिनेमा! एका बाजूला परंपरा जपणारं गावाकडचं कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारं शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि या घराच्या ताब्यावरून वादाची ठिणगी पडते…अशी ‘सुपर डुपर’ चित्रपटाची कथा आहे. हा सिनेमा ३ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आणि ‘सुपर डुपर’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर सुद्धा या चित्रपटाने दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं.

आता हा बहुचर्चित आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘सुपर डुपर’च्या डिजिटल प्रीमियरची घोषणा नुकतीच ZEE5 कडून करण्यात आली आहे. चित्रपटगृहात यश मिळवल्यावर आता ‘सुपर डुपर’ २९ मे २०२६ रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना २९ मे पासून हा सिनेमा ओटीटीवर घसबसल्या पाहायला मिळेल.

‘सुपर डुपर’मध्ये अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर, विदुला चौगुले, निर्मिती सावंत, हृषिकेश जोशी, शशांक शेंडे, कुशल बद्रिके आणि नम्रता संभेराव अशा लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटाबद्दल थोडक्यात…

रोहित आणि त्याची प्रेयसी ईशा हे दोघं मुंबईत ब्रोकरच्या मदतीने एक फ्लॅट खरेदी करतात. मात्र, त्यानंतर या दोघांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं, त्यांना मोठा धक्का बसतो. कारण, रोहित-ईशाने खरेदी केलेला सेम फ्लॅट गावाहून मुंबईत आलेल्या जाधव कुटुंबालाही विकण्यात आलेला असतो. आता पुढे कायदेशीर वाद सुटेपर्यंत दोन्ही कुटुंबांना एकाच घरात राहावं लागेल, असे आदेश न्यायालयाकडून दिले जातात, आणि यामुळे एकच गोंधळ निर्माण होतो. या सिनेमात विनोदाच्या जोडीला अनेक भावनिक प्रसंगही आहेत. परस्परविरोधी जीवनशैलीमुळे निर्माण होणारे संघर्ष, पिढ्यांमधील मतभेद, भावनिक नाती आणि शहरातील दैनंदिन संघर्ष यांची रंगतदार मांडणी या कथेमध्ये पाहायला मिळते.

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “सुपर डुपर’ ही मतभेद असूनही एकत्र राहायला शिकणाऱ्या माणसांची कथा आहे. चित्रपटाची संकल्पना विनोदी आणि गोंधळाने भरलेली असली तरी त्यामधील भावना अत्यंत जवळच्या वाटतात, कारण प्रत्येक कुटुंबाच्या स्वतःच्या सवयी, श्रद्धा आणि असुरक्षितता असतात आणि त्यातूनच विनोदनिर्मिती होते. अनपेक्षित परिस्थितीमुळे माणसे कशाप्रकारे एकमेकांच्या जवळ येऊ शकतात, हे या चित्रपटात विनोदाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. मराठी ZEE5च्या माध्यमातून ही कथा आता विविध भागांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल… याचा मला आनंद आहे.”

अभिनेता ललित प्रभाकर म्हणाला, “रोहित ही व्यक्तिरेखा अनेक तरुणांना आपलीशी वाटेल. तो महत्त्वाकांक्षी आहे, स्वतंत्र आहे आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, अचानक त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण होतो आणि त्यानंतर सगळंच बदलून जातं. आता मराठी ZEE5 वरील प्रेक्षकांना घरबसल्या हा मनोरंजक प्रवास अनुभवता येणार असल्याचा मला खूप आनंद आहे.”