Swapnasundari Movie Trailer : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता भूषण प्रधान त्याच्या ‘स्वप्नसुंदरी’च्या शोधात असल्याचं पाहायला मिळत आहे. ही ‘स्वप्नसुंदरी’ दुसरी-तिसरी कोणीही नसून त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. भूषणचा हा नवीन रॉमकॉम सिनेमा येत्या २४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

यामध्ये मराठी सिनेविश्वातील चॉकलेट बॉय अभिनेता भूषण प्रधान ‘राघव’ची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. राघवसाठी त्याचे आई-बाबा लग्नाची स्थळं पाहत असतात. पण, त्याला काही केल्या त्याच्या स्वप्नातील ड्रीम गर्ल भेटत नसते. अशातच एकेदिवशी अचानक राघवला मानसीचं स्थळ येतं आणि सगळंच बदलून जातं. मानसी राघवला अगदी शोभेल अशी…त्याच्या सगळ्या अटींनुसार परफेक्ट मुलगी असते. ती राघवला समजून घेते, संस्कारी असते, तिला उत्तम जेवण बनवता येतं, दिसायला सुद्धा अगदी क्युट आहे. आता मानसीमध्ये सगळेच चांगले गुण आहेत. त्यामुळे ट्रेलरच्या शेवटी राघव तिच्यावर काहीसा संशय घेताना दिसतो आणि सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी ही ड्रीम गर्ल नंतर मात्र, राघवला नकोशी होते. मला या मुलीशी लग्न करायचं नाही असं तो ठामपणे ठरवतो.

आता राघवच्या आयुष्यात आलेली मानसी नेमकी आहे तरी कशी याचा उलगडा चित्रपटगृहात होईल. यामध्ये प्रेक्षकांना भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची फ्रेश जोडी पाहायला मिळेल. सायली यापूर्वी ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘येक नंबर’, ‘झुंड’ अशा सिनेमांमध्ये झळकली आहे. तर, ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमात नायकाच्या आईची भूमिका साकारणार आहेत लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा नवलकर.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अक्षय शिंदे म्हणाले, “आजच्या तरुणाईसाठी लग्नाचा निर्णय आणि योग्य जोडीदाराची निवड हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तितकाच गोंधळात टाकणारा विषय झाला आहे. हीच गोष्ट आम्ही हलक्या-फुलक्या, विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भूषण प्रधानने ‘राघव’ची भूमिका अतिशय उत्तमरित्या जिवंत केली असून, अनेकांना त्याच्यात स्वतःचा भास होईल. कथा जरी राघवची असली तरी हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आनंद घेण्यासारखा चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटेल.”

राघवच्या आयुष्यातील ‘स्वप्नसुंदरी’ कोण ठरणार आणि त्याच्या लग्नाची गाठ अखेर कशी जुळणार, याची उत्सुकता आता वाढली असून त्यासाठी प्रेक्षकांना २४ जुलैची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामध्ये सायली पाटील, भूषण प्रधान यांच्यासह शिल्पा नवलकर, अशोक शिंदे, माधवी जुवेकर असे कलाकार झळकणार आहेत.