Swapnil Joshi father 76th birthday: स्वप्नील जोशी सोशल मीडयावर सक्रिय असतो. तो नेहमीच विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता त्याने वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
स्वप्नील जोशीने वडिलांबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याचे वडिलांबरोबरचे काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. तसेच, त्याने तो लहान असतानाचा आई-वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, त्याची मुले आणि वडील यांचेही फोटो पाहायला मिळत आहेत.
“तुम्हाला पाहून मी खूप काही…”
आता हे फोटो शेअर करत त्याने लिहिले, “बाबा, तुम्हाला बघत मी माझं आयुष्य घालवले आहे. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, बिझनेस करता. तसेच, तुम्ही दहा पावले पुढे जाऊन गोष्टींचा विचार करता हे मी बघत आलोय. तुमची दूरदृष्टी, तुमचं व्यावसायिक कौशल्य, माणसं आणि परिस्थिती समजून घेण्याची तुमची क्षमता.. तुम्हाला पाहून मी खूप काही शिकलो आहे.”
त्याने पुढे लिहिले, “खरं सांगायचं तर ही गोष्ट फक्त व्यवसायापुरती मर्यादित नाही. ती तुम्ही माणूस म्हणून कोण आहात याबद्दल आहे.
तुमची तत्त्वं, तुमची मूल्यं, तुमची भावनिक ताकद, तुमची आध्यात्मिक बाजू, आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा प्रगत दृष्टिकोन, सतत बदलत्या काळासोबत स्वतःला बदलत राहणं, शिकत राहणं. याबरोबरच नवीन गोष्टी स्वीकारत असतानाही तुम्ही स्वतःची ओळख कधीच हरवली नाही. कुठेतरी या प्रवासात मला जाणवलं की, मला इतर कोणापेक्षाही चांगले बनायचे नाही,मला तुमच्यासारखा माणूस बनायचं आहे. तुमच्यासारखी व्यक्ती बनण्याचा मी प्रयत्न करतोय आणि मला माहीत आहे, त्यासाठी मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.”
त्याने असेही लिहिले, “तुम्ही ज्या पद्धतीने आयुष्य जगता ते पाहून मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतं. वयाच्या ७६व्या वर्षीही तुमची जगण्याची जिद्द, तुमची जिज्ञासा, तुमची ऊर्जा, नवीन अनुभव घेण्याची, शिकण्याची, काम करण्याची, हसण्याची आणि सतत पुढे जाण्याची तुमची इच्छा… या सगळ्याचं मला मनापासून कौतुक वाटतं. तुम्ही फक्त मला सांगत नाही की वय हा केवळ एक आकडा आहे; तुम्ही ते प्रत्येक दिवशी कृतीतून सिद्ध करता. तुम्ही माझे वडील आणि शिक्षक असताना, तुम्ही कधी माझे मित्र झालात हे कळलंच नाही. तु्म्ही असे मित्र आहात, ज्यांचा सल्ला ऐकण्याची कदाचित मला नेहमी इच्छा असतेच असं नाही. पण, पण ज्यांचा सल्ला मला जवळजवळ प्रत्येक वेळी गरजेचा असतो, म्हणून आज तुमच्या ७६व्या वाढदिवशी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मूल्यं, धैर्य, दूरदृष्टी आणि मनापासून जगत आयुष्य कसं उभं करायचं, हे मला शिकवल्याबद्दल थँक्यू.”
शेवटी त्याने लिहिले, “एक दिवस माझी मुलं माझ्याकडे पाहतील, तेव्हा त्यांना माझ्यात तुमच्यातला थोडासा अंश तरी दिसावा एवढीच माझी इच्छा आहे. बाबा, ७६व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ. तुम्ही माझे वडील आहात, शिक्षक आहात, मित्र आहात आणि माझे खरे हिरो आहात”, असे लिहित स्वप्नीलने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, स्वप्नीलच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट्स करत भावना व्यक्त केल्या आहेत.
