स्वप्नील जोशी आणि त्याचं कोकणावर असलेलं प्रचंड प्रेम, याबद्दल आता सर्वांनाच माहिती आहे. काही वर्षांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये स्वप्नीलने रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्याचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर सगळेजण त्याच्या या ऑडिओवर रील्स शेअर करू लागले. आता अभिनेत्याने कोकणातील आणखी एका सुंदर जागेचं दर्शन त्याच्या चाहत्यांना घडवलं आहे.
स्वप्नील जोशी अलीकडेच आपल्या कुटुंबासह वेंगुर्ल्यात फिरायला गेला होता. याचा खास व्हिडीओ अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. स्वप्नील त्याच्या कुटुंबीयांसह वेंगुर्ल्यातील Araqila Retreat या आलिशान हॉटेलमध्ये राहिला होता. निसर्गरम्य वातावरण स्थित हे हॉटेल अगदी समुद्रकिनाराच्या शेजारी आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या संपूर्ण कुटुंबाने याठिकाणी एन्जॉय केलं.
आलिशान रूम्स, प्रत्येक रूमच्या बाल्कनीतून दिसणारा समुद्राचा View, रिसॉर्टमधून Beach कडे जाणारा सुंदर रस्ता, सूर्यास्ताचा व्ह्यू, चविष्ट मालवणी जेवण, Infinity स्विमिंग पूल या सगळ्याची झलक स्वप्नीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय.

स्वप्नील जोशी आणि त्याच्या कुटुंबीयांनी कोकणात शिरवाळे, फिश फ्राय, सार, बटाट्याचे काप, लाल माठाची भाजी, काजूची भाजी, वरण-भात अशा अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतला. याशिवाय स्वप्नीलने उकडीचे मोदकही खाल्ले. आपलं कोकण ही आपली श्रीमंती आहे, असं अभिनेता या व्हिडीओमध्ये आवर्जून सांगतो.

स्वप्नील म्हणाला, “कोकण…माझं कोकणावर किती प्रेम आहे हे काय आता लपून राहिलेलं नाही. काही वर्षांपूर्वी मी एका पॉडकास्टमध्ये याबद्दल बोललो होतो आणि तो ऑडिओ खूप व्हायरल झाला. लोकांनी त्याच्यावर स्टोरीज शेअर केल्या, रील्स व्हिडीओ बनवले, मीम्स क्रिएट केले…एकंदर अचानक सगळे ‘आरे-वारे’बद्दल बोलू लागले. पण, खरं सांगायचं झालं तर, या सगळ्या पलीकडे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती म्हणजे, माझं कोकणावर असलेलं निखळ आणि अथांग प्रेम. त्यामुळे जेव्हा मला माझ्या कुटुंबासह वेंगुर्ल्यात काही दिवस घालवण्याची संधी मिळाली, तेव्हा मला खात्री होती की ही आमची ही ट्रिप खूप छान होणार आहे…आणि घडलंही अगदी तसंच! आमचं छान आदरातिथ्य करण्यात आलं. सुंदर, शांत अशा या जागी आम्ही वेळ घालवला. धावपळीच्या जगापासून काहीसं दूर जाऊन कुटुंबाबरोबर निवांत क्षण अनुभवले. प्रिय कोकण, तू पुन्हा एकदा माझं मन जिंकून घेतलं आहेस.”
स्वप्नीलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
