मराठी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीची ओळख आहे. तो नेहमी वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चर्चांचा भाग बनतो. मात्र, आता त्याने एका मुलाखतीदरम्यान, 'उत्तररामायण' मालिकेच्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला आहे. स्वप्नील जोशीने नुकतीच 'व्हायफळ' या यूट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. यावेळी बोलताना त्याने 'उत्तररामायण' आणि 'श्रीकृष्ण' मालिकेत जेव्हा त्याने भूमिका साकारली होती, त्यावेळी स्वर्गीय डॉ. रामानंद सागर यांनी मला तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले होते. कारण ते म्हणायचे, ज्या वयात पालक आपल्या मुलांवर संस्कार करतात, त्या वयात तू संपूर्ण देशावर संस्कार करत आहेस. त्यावेळी त्या भूमिका ते समजाऊन सांगायचे. या भूमिका करायच्या तर ते आधी समजून घेतले पाहिजे, आपलेसे करून घेतले पाहिजे. मला वाटतं, त्यातून माझ्यावर काही संस्कार झाले असणार. ते वयही तसेच होते. तेव्हापासून माझ्यात ती आध्यात्मिकता आहे. मी फार धार्मिक नाही, पण आध्यात्मिक आहे. हेही वाचा: Bigg Boss Marathi : ‘भाऊचा धक्का’ गाणं गायलं अन् लिहिलं आहे ‘बिग बॉस’मध्ये झळकलेल्या गायकाने, पोस्ट करत म्हणाला… इतक्या लहान वयात ती जी स्क्रीप्ट असायची, त्याचा अर्थ कितपत समजायचा? यावर उत्तर देताना त्याने म्हटले आहे की, गोष्ट सांगायची कला मला माझ्या आईच्या आईकडून अवगत झाली होती. ती रोज मला गोष्टी सांगायची, ज्यावेळी मी वयाच्या नवव्या वर्षी 'उत्तररामायण' केलं; १५ व्या वर्षी 'श्रीकृष्ण' केलं. 'उत्तररामायणा'मध्ये प्रभू रामचंद्रांची जी दोन मुलं होती लव आणि कुश यातील कुशची भूमिका स्वप्नीलने साकारली होती आणि 'श्रीकृष्ण' मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. त्यावेळची आठवण सांगताना अभिनेत्याने म्हटले आहे की, दिवसभराचे शूटिंग संपले की, रामानंद सागर रात्री बोलवायचे आणि उद्या आपण काय करणार आहोत, हे समजाऊन सांगायचे. आधी ते सीन वाचून दाखवायचे, मग त्याचा अर्थ समजावयाचे, त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या संबंधित गोष्टी सांगायचे. कोणत्या पुस्तकातून काय घेतलं आहे; मग टीव्हीवर दाखवण्यासाठी आपण तथ्य बाजूला न करता काय केलंय, हे सांगायचे. साधारण ते आजोबांच्या वयाचे होते, त्यामुळे ती गोष्ट, त्यामधला भाव आधीच समजलेला असायचा. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही शूटिंग करायचो, त्यावेळी संवाद पाठ करणे सोपे असायचे कारण गोष्ट आधीच माहीत असायची, त्यामागची भावना माहीत असायची. त्यामुळे आम्हाला शूटिंग करताना मजा यायची. कधी त्याचे दडपण आले नाही, असे स्वप्नील जोशीने म्हटले आहे.