Raja Shivaji Riteish Deshmukh: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश विलासराव देशमुख मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने सर्वांच्या अंगावर शहारे आणले आहेत. या टीझरची भुरळ आता बॉलीवूडचा ‘तान्हाजी’ म्हणजेच अभिनेता अजय देवगणलाही पडली आहे. अजयने आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर पोस्ट शेअर करत रितेश देशमुख आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचा लाडका दादा, अभिनेता व दिग्दर्शक रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. त्यानंतर प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतही या प्रकल्पाबाबत उत्सुकता निर्माण झाली. या झलकनंतर अनेक दिग्गज कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. आता बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीतून याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मधून मराठ्यांच्या शौर्यगाथेला मोठ्या पडद्यावर साकारणाऱ्या अजय देवगणने ‘राजा शिवाजी’साठी खास पोस्ट करून शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे. अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया स्टोरीवर चित्रपटाचे व्हिज्युअल शेअर करत “तान्हाचे नमन राजे. This looks incredible!” असं म्हणत चित्रपटाच्या भव्यतेचं कौतुक केलं. यासोबतच “राजा शिवाजीसाठी तुम्हाला दैदीप्यामान यश मिळो हीच सदिच्छा… जय शिवराय” अशा शब्दांत त्यांनी रितेश विलासराव देशमुख आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
अजय देवगणची पोस्ट

अजय देवगणच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून, चाहत्यांकडून या प्रतिक्रियेला ‘तान्हाजीकडून शिवरायांना दिलेला मानाचा मुजरा’ असं म्हटलं जात आहे. ही पोस्ट रितेशने त्याच्या अकाउंटवर रिपोस्ट केली आहे. प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार, असं रितेशने अजय देवगणला म्हटलं.
विशेष म्हणजे, यापूर्वी ‘छावा’ चित्रपटातून संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशल यांनीही “आबासाहेब” अशी कमेंट करत शिवरायांना आदरांजली वाहिली होती. इतरही अनेक कलाकार रितेश देशमुखला राजा शिवाजी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.
सोशल मीडियावर या पोस्ट्सना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून, नेटकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून मिळणारा हा पाठिंबा पाहता, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस आता अधिकच शिगेला पोहोचली आहे.
