Samadhan Sarvankar post on Tejaswini Lonari Birthday : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम तेजस्विनी लोणारी आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आई झाल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने तेजस्विनीसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. या खास दिवशी तिचा पती व शिवसेना नेते समाधान सरवणकर यांनी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर करत तिचे आभार मानले आहेत आणि आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने नुकतंच आपल्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. समाधान यांच्या या सुंदर पोस्टवर मेघा धाडेसह अनेक कलाकारांनी कमेंट करत तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

समाधान सरवणकर यांनी तेजस्विनीबरोबरच्या काही फोटोंचा एक व्हिडीओ शेअर करून सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. समाधान सरवणकर यांनी लिहिलं, “माझं प्रेम, माझी आयुष्यभराची जोडीदार, माझ्या सुंदर बायकोला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! हा वाढदिवस खूप खास आहे, कारण माझी पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात आल्यानंतरचा हा तुझा पहिलाच वाढदिवस आहे. तू माझ्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद आणला आहेस. तू सोबत असण्याने आयुष्यातील प्रत्येक क्षण आणखीच सुंदर झाला आहे.”

पुढे त्यांनी लिहिलं, “तुझ्याबरोबर असताना चेहऱ्यावर उमटलेलं प्रत्येक हसू, प्रत्येक आठवणीसाठी, प्रत्येक छोट्या क्षणासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्यासाठी मी मनापासून आभारी आहे. मी नेहमी तुझ्याबरोबर राहण्याचं, तुझ्यावर प्रेम करण्याचं, तुझा आदर करण्याचं आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवण्याचं वचन देतो.”

पाहा समाधान सरवणकर यांची पोस्ट

समाधान सरवणकर यांनी केलेल्या या पोस्टवर तेजस्विनी लोणारीने कमेंट केली आहे. तिने ‘थँक्यू. लव्ह यू फॉरेव्हर’ अशी प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री मेघा धाडे हिनेही तेजस्विनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, तेजस्विनी लोणारी व समाधान सरवणकर यांनी डिसेंबर २०२५ मध्ये लग्न केलं. २२ ऑगस्ट २०२६ रोजी तेजस्विनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ९ सप्टेंबर रोजी तिच्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. तेजस्विनी व समाधान सरवणकर यांनी मुलाचं नाव ‘समराज’ असं ठेवलं आहे. सध्या तेजस्विनी मुलाबरोबर वेळ घालवतेय.