अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्याची मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांसह ती मालिकांमध्येही झळकली आहे. ‘समांतर’ आणि ‘रानबाजार’ या दोन सुपरहिट वेब सीरिजमध्येही तिने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला ‘मी सिंधूताई सपकाळ’ या चरित्रपटामुळे खरी ओळख मिळाली.
या चित्रपटामध्ये अनाथाची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधूताईंची भूमिका तेजस्विनीने ताकदीने साकारली. विशेष म्हणजे तिच्या आईने, ज्योती चांदेकर यांनीही चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माईं म्हणून वावरण्याची संधी मिळाली. या मायलेकींच्या कामाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. भूमिका साकारण्यासाठी तेजस्विनीने त्यांची भेट देखील घेतली होती. माईंबद्दल तिच्या मनामध्ये खूप आदर आहे. तिने सोशल मीडियावर माईंशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे.




या पोस्टमध्ये तिने “फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणाने एकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो…. सिंधुताई सपकाळ! माई, आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही…! उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं ! मित्रांनो, माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाईने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या…!” असे लिहिले आहे. तिने या प्रदर्शनामधले फोटो शेअर केले आहेत.
४ जानेवारी २०२२ रोजी सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले. उद्या (१४ नोव्हेंबर) रोजी त्यांची पहिली जयंती आहे. या निमित्ताने प्रणव सातभाई आणि पद्मश्री डॉ. सौ. सिंधूताई सपकाळ परिवार यांनी मिळून कृतार्थ सिंधू या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये माईंच्या डिजीटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन भरवण्यात आले आहे. १२,१३ आणि १४ नोव्हेंबर या तीन दिवसांसाठी बाळासाहेब ठाकरे, कलादालन,२१६६, सारसबाग रस्ता, अभिनव कला महाविद्यालयाजवळ शुक्रवार पेठ, पुणे ३० येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.