Tejaswini Pandit Post on Raj Thackeray Birthday : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय नेत्यांबरोबरच मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच मराठीची लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिच्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तेजस्विनीने राज ठाकरेंसोबतचे खास फोटो शेअर करत, “तुमच्यासाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, आमच्यासाठी ती भावना आहे”, अशा शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तेजस्विनीने ४ फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी दोन फोटोत तीदेखील आहे, तर इतर दोन फोटो फक्त राज ठाकरेंचे आहेत. राज ठाकरे फक्त नाव नसून भावना असल्याचं तेजस्विनीने म्हटलंय. तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरु दे, असं म्हणत तेजस्विनीने राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी पोस्ट

“तुमच्यासाठी “राज ठाकरे” हे नाव असेल फक्त,
आमच्यासाठी ती भावना आहे.
हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे असं वाटतं. मी अपवाद नाही.
साहेब,
तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही. तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरु दे, तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे ,कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ तुम्हाला मिळूदे आणि राजकारणासारख्या रुक्ष वातावरणत स्वतः तील संवेदनशीलता जपता येऊदे अशी तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करते.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
हसत राहा.
खूप प्रेम.
जय महाराष्ट्र,”
अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंच्या वाढदिवशी केली आहे.

दरम्यान, तेजस्विनी पंडित दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवसाला पोस्ट करत असते. इतकंच नाही तर तेजस्विनीने २०२४ मध्ये राज ठाकरेंवर आधारित ‘येक नंबर’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रेम व राजकीय महत्त्वाकांक्षेवर आधारित हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ चित्रपटात धैर्य घोलप व सायली पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आधी चित्रपटगृहात आणि नंतर झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, संजय मोने, आनंद इंगळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.