Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी असणार आहे. या चित्रपटात तेजस्विनी नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे? तसेच चित्रपटात काम करतानाचा तिचा अनुभव कसा होता याबद्दल जाणून घेऊयात…

दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit ) यामध्ये वीरांगणा ‘भवानी’ ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :पिया तू अब तो आजा…’, सदस्यांचा जबरदस्त डान्स अन् घरात झाली दोन नवीन पाहुण्यांची एन्ट्री! कोण आहेत ते? एकदा पाहाच…

तेजस्विनी पंडितने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं केलं कौतुक

चित्रपटातील भूमिकेबद्दल तेजस्विनी ( Tejaswini Pandit ) सांगते की, “कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना कलाकारांसाठी त्यातील आव्हान ही सुखावह असतात. त्यातही आपली मातृभाषा नसलेल्या इतर चित्रपटांमध्ये काम करणं अधिक कठीण असतं. ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात सगळ्यात मोठं भाषेचं आव्हान होतं कारण, केवळ भाषा नव्हे तर त्याचं व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं. मला माझ्या संवादातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याचा लहेजा समजून-उमजून भूमिका करावी लागत होती. साऊथचे सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ वेळेबाबतीत प्रचंड शिस्तप्रिय आहेत. त्यांचा साधेपणा मला खूप भावला. आजवर माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील माझ्या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील याची मला खात्री आहे.”

तेजस्विनी पंडित ( फोटो सौजन्य : Tejaswini Pandit इन्स्टाग्राम )

‘अहो विक्रमार्का’ हा दाक्षिणात्य सिनेमा असला तरी तो मराठीत देखील प्रदर्शित होणार आहे. आता दाक्षिणात्य आणि मराठी कलाकार चित्रपटात काय कमाल करतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा पहिला ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ६ भाषांमध्ये ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : Video : “मी काहीतरी आणलंय…”, हिंदी शोमध्ये श्रद्धा कपूरचा मराठीत संवाद, स्पर्धकाला दिली खास भेटवस्तू! सर्वत्र होतंय कौतुक

दरम्यान, दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता देव गिल ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit ), सयाजी शिंदे, चित्रा शुक्ला अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे.