मनोरंजन विश्वातील असा एक चित्रपट ज्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘The Bombay Blood’! हा एक इंटरनॅशनल चित्रपट असून, यामध्ये आपली मराठी भाषा, आपली मराठी संस्कृती दाखवण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचा क्लायमॅक्स पूर्णपणे मराठीत आहे. जुलैमध्ये या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, याशिवाय २० ऑगस्टला ‘The Bombay Blood’चा प्रीमियर पार पडला. पण, या सगळ्यात चर्चा आहे ती, या जर्मन सिनेमाचं मराठी कनेक्शन. या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा मराठमोळ्या गौरव ठाकूरने केलं आहे.
मराठीत पहिल्यांदाच हा अनोखा प्रयोग पार पडला आहे. याबाबत गौरव ठाकूर म्हणतो, “नमस्कार…मी गौरव हृषीकेश ठाकूर…मी एक भारतीय फिल्ममेकर आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून मी ब्रेमेन जर्मनीत राहतोय. मी एक सिनेमा तुमच्या भेटीला आणलाय, याचं नाव आहे ‘The Bombay Blood’! आम्ही ९ महिन्यांत हा संपूर्ण सिनेमा तयार केला आहे. आपल्या देशातून मी जर्मनीत आलो…इथे येऊन ९५ मिनिटांचा एक सिनेमा तयार करणं ही गोष्ट माझ्यासाठी अजिबातच सोपी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच यासाठी खूप मेहनत घेतली. स्टुडिओ किंवा या सिनेमाच्या पाठिशी कोणताही बिग बॅनर नसताना आम्ही प्रेक्षकांना हॉलीवूड लेव्हलचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदाच एका इंग्रजी सिनेमात आपली मराठी भाषा वापरली गेलीये. यापूर्वी इंग्रजी-स्पॅनिश, इंग्रजी -रशियन अशा भाषा सिनेमांमध्ये वापरल्या गेल्या आहेत. पण, आम्ही पहिल्यांदाच हा वेगळा प्रयोग केलाय.”
हा सिनेमा इंग्रजी भाषेत असला तरीही, कथेचा नायक, संस्कृती सगळं काही मराठीत आहे. या सिनेमाची कथा सुद्धा तेवढीच थरारक आहे. ‘The Bombay Blood’ हा एक महत्त्वाकांक्षी Indo-German Co-production असून, एका मराठमोळ्या पोतराज कलावंताच्या कथेतून विज्ञान, संस्कृती आणि मानवी संघर्षाची वेगळी गोष्ट मांडतो. जर्मनीतील ब्रेमेन शहरात ही कथा सुरू होते. या कथेचा नायक कामानिमित्त ब्रेमेन शहरात जातो पण, तो तिथे पोहोचल्यावर जगात एक महामारी पसरते…यानंतर बरेच खुलासे होतात. या सगळ्यावर एकच उपाय असतो तो म्हणते, The Bombay Blood Group…हाच नायकाचा रक्तगट असतो आणि इथून या सिनेमाचा प्रवास सुरू होतो.
‘The Bombay Blood’ सिनेमाचा क्लायमॅक्स संपूर्णपणे मराठीत शूट करण्यात आला आहे. या चित्रपटाचा प्रीमियर शो हाऊसफुल्ल ठरला होता. हा चित्रपट २० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत ‘शॉबर्ग सिनेमा’ या ठिकाणी पाहायला मिळेल. याचे प्रयोग केवळ संध्याकाळी होतील. अशी माहिती गौरव ठाकूरने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्वांना दिली आहे.
दरम्यान, गौरवला मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनी सुद्धा या सिनेमासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
