Adah Sharma Marathi Debut : मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना नेहमीच आशयघन आणि वेगळ्या धाटणीचे सिनेमे पाहायला मिळतात. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी ‘झिगझॅग प्रॉडक्शन’ आणि ‘गणराज स्टुडिओज’ यांनी आपल्या आगामी भव्य मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘गजरा’ असं या चित्रपटाचं नाव असून, नुकतंच या चित्रपटाचं अत्यंत उत्कंठावर्धक आणि अंगावर काटा आणणारं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणारी ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा या ‘गजरा’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अदा शर्माचा अत्यंत रौद्र, भीतीदायक आणि रक्ताने माखलेला चेहरा पाहायला मिळत आहे. तिच्या डोळ्यांमधील तीव्र भाव, कपाळावर लावलेलं कुंकू आणि नाकातील पारंपरिक नथ हा अदाचा लूक लक्षवेधी ठरत आहे.

‘गजरा’ हा चित्रपट समाजातल्या सत्य घटनांवर आधारित असून, एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्रेयस जाधव करत आहेत. आपल्या वेगळ्या दिग्दर्शन शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रेयस जाधव यांचा हा चौथा चित्रपट आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती अमोल बोरकर यांनी केली आहे.

या चित्रपटाची घोषणा करताना दिग्दर्शक श्रेयस जाधव म्हणाले, “जेव्हा ‘गजरा’ या चित्रपटाची मूळ संकल्पना आणि यामागील सत्य घटना माझ्यासमोर अमोल बोरकर यांनी मांडली, तेव्हाच मला जाणीव झाली होती की, हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसेल, तर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरेल. ही एक अतिशय तीव्र, संवेदनशील आणि अंगावर काटा आणणारी कथा असेल. सध्या मी या चित्रपटाबद्दल तुम्हाला एवढंच सांगू शकतो. या भूमिकेसाठी आम्हाला अभिनेत्रीच्या रुपात एका अशा चेहऱ्याची गरज होती… जो चेहरा निरागस आणि तितकाच रौद्र अवतार घेणारा असेल. या भूमिकेसाठी अदा शर्मापेक्षा उत्तम पर्याय दुसरा असूच शकत नव्हता. पोस्टरमध्ये तिची जी झलक दिसत आहे, ती तर फक्त एक सुरुवात आहे. चित्रपटात तिचा एक वेगळाच अभिनय पॅटर्न प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा भव्य थरारपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आणि शूटिंगला सुरुवात करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे.”

‘गजरा’ चित्रपटाच्या संगीताची धुरा सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख ठरली नसली तरी हा भव्य मराठी चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अदा शर्माचा पहिल्या पोस्टरवरील हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.