The Maharashtra Files Marathi movie trailer release date and cast updates : ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द बंगाल फाइल्स’ यांसारख्या फाइल्स नावाच्या चित्रपटांनंतर आता आणखी एक फाइल्स टायटलचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, हा सिनेमा दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींचा नाही. मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाइल्स’चा ट्रेलर १८ मे रोजी रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये भ्रष्टाचार, जमिनींचे अधिग्रहण आणि सत्तेचा गैरवापर यांवर आधारित राजकीय ड्रामा पाहायला मिळतो.
‘द महाराष्ट्र फाइल्स’ या चित्रपटात लोकप्रिय मराठी कलाकार झळकणार असून लवकरच हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे. ‘द महाराष्ट्र फाइल्स’ या चित्रपटात लोकप्रिय मराठी कलाकार झळकणार असून लवकरच हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे. संजीवकुमार राठोड यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जयजगदंब प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या २९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील उषा नाडकर्णी ते सयाजी शिंदे यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत.
चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर समोर आलेल्या तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये भ्रष्ट व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांमुळे सामान्य लोकांमध्ये वाढत चाललेली दरी दाखवण्यात आली आहे. कथेमध्ये ४० किलोमीटर लांबीच्या फोर-लेन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाभोवती मोठा राजकीय आणि सामाजिक संघर्ष उभा राहतो. आपल्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी लढताना दिसतात, तर दुसरीकडे राजकारणी, अधिकारी आणि प्रभावशाली व्यावसायिक स्वतःच्या फायद्यासाठी संपूर्ण व्यवस्थेचा गैरवापर करताना दाखवले आहेत.
ट्रेलरमध्ये विकासाच्या नावाखाली नियोजनबद्ध पद्धतीने जमिनी बळकावल्या जात असल्याचे संकेत दिले आहेत. कमी मोबदला, सत्तेचा गैरवापर आणि संशयास्पद मृत्यू यांचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे. अनेक दृश्यांमध्ये शेतकरी आणि मजुरांचा राग, असहाय्यता आणि व्यवस्थेविरोधात एकत्र येण्याची त्यांची तयारी दाखवण्यात आली आहे.
चित्रपटात झळकणार लोकप्रिय कलाकार
‘द महाराष्ट्र फाइल्स’मध्ये मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, सयाजी शिंदे, वीणा जामकर आणि नागेश भोसले यांसारखी कलाकारांची मोठी फौज दिसणार आहे. या कलाकारांसह चित्रपटात सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी देखील झळकणार असल्याचं ट्रेलरमधून दिसतं.
एकूणच, हा सिनेमा भ्रष्टाचार, वादग्रस्त जमीन अधिग्रहण, शेतकरी आणि उद्योगपतींना मिळणारी असमान वागणूक, तसेच सत्ता आणि न्याय यांवरील प्रश्न मांडणारा राजकीय ड्रामा आहे. महामार्ग प्रकल्प आणि त्यानंतर निर्माण झालेला संघर्ष ही या कथानकाची मुख्य पार्श्वभूमी आहे. हा सत्य घटनेवर आधीरित असल्याचं ट्रेलरमधून म्हटलं गेलं आहे.
