Tighee Marathi Movie Trailer: सध्या एकापेक्षा एक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये हिंदी,दाक्षिणात्य सिनेमांसह मराठी चित्रपटांचादेखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी माया सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर, गिरिश ओक हे कलाकार चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आता या सगळ्यात आणखी एका सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. तिघी असे या सिनेमाचे नाव आहे.

‘तिघी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

या सिनेमात तीन लोकप्रिय अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी या तीन अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला स्वाती, सरू सावकाश असा डायलॉग ऐकायला मिळतो. दोन लहान मुली पळताना दिसतात. त्यानंतर नेहा पेंडसे निर्विकार चेहऱ्याने उभी दिसते. कोण पाहिजे? असा प्रश्न तिला विचारला जातो.

त्यानंतर एक दरवाजा उघडतो. भारती आचरेकर दरवाजा उघडतात. नेहा पेंडसेचे पात्र आई अशी हाक मारते. ट्रेलरमध्ये पुढे दाखवलेल्या सीननुसार सोनाली आणि नेहा यांनी बहि‍णींची भूमिका साकारली आहे. तर भारती आचरेकर यांनी आईची भूमिका साकारली आहे.

बहि‍णींमधील भांडणे, गैरसमज, त्यांच्या आयुष्यातील अडचणी, त्यांच्यात आलेला दुरावा, वैयक्तिक आयुष्यातील गोंधळ, आईचे आजारपण, मुलींनी ताठ मानेनं जगावं अशी आईची तळमळ, प्रेम, घरच्यांपासून काही गोष्टी लपवल्या असल्याचे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक सीन उत्सुकता वाढवतो. तसेच, प्रत्येक सीन दुसऱ्या सीनकडे जात असताना त्यामध्ये असलेली सहजता लक्ष वेधून घेते.

ट्रेलरच्या शेवटी भारती आचरेकर यांचा आवाज ऐकायला मिळतो. त्या म्हणतात, “मुलींच्या आयुष्यात बापाचं खूप महत्व असतं. मला ठाऊक नव्हतं. या दोघींसाठी मला एकटीला समुद्र ओलांडायचा आहे.” नात्यांची गुंतागुंत असलेला, भावनिक असा हा चित्रपट असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. तसेच ट्रेलरच्या शेवटी ‘आईचं घर, आईच्या आठवणी’ असे लिहिले आहे. हा ट्रेलर शेअर करताना तीन भितींच्या घराची गोष्ट असे लिहिले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन जिजिविषा काळे यांनी केले आहे. तसेच, निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्नील भंगाळ, नेहा पेंडसे यांनी केले आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.

सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे, भारती आचरेकर यांच्याबरोबरच पुष्कराज चिरपुटकर, निपुण धर्माधिकारी हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.