Best Marathi Biopics To Watch Free On YouTube : मराठीमध्ये आतापर्यंत विविध विषयांवर आधारित चित्रपट बनले आहेत. मराठी चित्रपटांत कलाकार नायक नसतो तर कथा चित्रपटाचा नायक असते असं म्हटलं जातं, त्यामुळे बऱ्याचदा कलाकार दिसायला किती सुंदर आहे यापेक्षा त्यांचा अभिनय किती सुंदर आहे याकडे पाहिलं जातं आणि मग प्रेक्षकांचाही अशा कलाकृतींना चांगला प्रतिसाद मिळतो.

ओटीटीमुळे सध्या अनेकदा प्रेक्षक घरबसल्यास त्यांना विविध विषयांवर आधारित चित्रपट कुठे पाहता येतील याच्या शोधात असतात. सध्या ओटीटीवर क्राईम, थ्रिलर, कॉमेडी, रोमँटिक अशा विविध धाटणीचे चित्रपट व सीरिज प्रदर्शित होत आहेत, तर चरित्रपटांचीही सध्या बरीच क्रेझ आहे. मराठीमध्येसुद्धा अनेक लोकप्रिय मंडळींवर आधारित बायोपिक बनवण्यात आले आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला मराठीतल्या अशा काही तीन चरित्रपटांची नावं सांगणार आहोत जे तुम्ही मोफत यूट्यूबवर पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते चित्रपट.

यूट्यूबवर मोफत पाहा तीन बायोपिक

चरित्रपटांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. कलाकारांवर आणि समाजातील बड्या व्यक्तींवर आधारित चित्रपट पुस्तक वाचायला आणि पाहायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. मराठीमध्ये बनलेल्या काही बायोपिकपैकी ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’, ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या चरित्रपटांचा समावेश आहे.

आणि… डॉक्टर काशिनाथ घाणेकर – अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ या २०१८ मध्ये आलेल्या चरित्रपटात अभिनेता सुबोध भावेनं डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली आहे. सुबोधच्या या चित्रपटातील कामासाठी अनेकांनी त्याचं कौतुक केलं. त्याच्याबरोबर या चित्रपटामध्ये अभिनेत्री वैदेही परशुरामी महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटामध्ये अभिनेता सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, प्रसाद ओक, नंदिता पाटकर यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमधून झळकले. एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवलेल्या डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये त्यांच्या खासगी आयुष्यासह व्यावसायिक आयुष्यातील प्रवासही दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट यूट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

मी सिंधुताई सपकाळ – कोणाचाही आधार नसलेल्या लहान मुलांना मायेचा हात देणाऱ्या दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित सिंधुताई यांच्या भूमिकेत झळकली आहे, तर दिवंगत अभिनेत्री ज्योती पंडित यांनीसुद्धा यामध्ये सिंधुताई यांच्या उतार वयातील भूमिका साकारली आहे. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट तुम्ही यूट्यूबसह झी ५ आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरसुद्धा पाहू शकता.

भाई : व्यक्ती की वल्ली महेश मांजरेकर दिग्दर्शित २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता सागर देशमुख, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, सुनील बर्वे यांसारखे इतर काही लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकले आहेत. हा चित्रपट लोकप्रिय मराठी साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. सागर देशमुख मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूब बरोबर नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरसुद्धा पाहू शकता.