कोकणातल्या एका गावात घडणारी, मराठीतील उत्तमोत्तम कलाकारांना एकत्र आणणारी, मंजुळा या स्त्री पात्राभोवती फिरणारी काहीशी गूढ, भय आणि विनोदाचं मिश्रण असलेली गोष्ट विविध कोरगावकर दिग्दर्शित ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एकूणच विनोदी भयपटाची ही जमून आलेली भट्टी आणि अशा पद्धतीच्या चित्रपटांकडे पाहण्याचा कलाकारांचा दृष्टिकोन अशा अनेक विषयांवर उषा नाडकर्णी, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, ओम भूतकर या नावाजलेल्या कलाकारांनी आणि दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या भेटीत गप्पा मारल्या.
उत्तम विनोदी भयपट देण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न
या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी यांनी रवीअण्णा हे महत्त्वाचं पात्र साकारलं आहे. या चित्रपटाची पटकथा हातात आल्यापासून प्रत्यक्ष चित्रीकरणापर्यंत आलेला अनुभव जितेंद्र यांनी थोडक्यात सांगितला. ‘विविधने पहिल्याच भेटीत अतिशय शांतपणे आणि आत्मविश्वासाने मला गोष्ट ऐकवली तेव्हाच खरंतर हा चित्रपट करायचा निर्णय झाला होता. गोष्ट ऐकवली तेव्हा काही कलाकारांची निवड झाली होती, पण जेव्हा वाचनासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो तेव्हा हा किती मोठा गोतावळा आहे हे लक्षात आलं. तेव्हा असं वाटलं की मित्रा…आता इतक्या चांगल्या कलाकारांना एकत्र तर केलं आहेस, पण यांना आवरणार कसं? मात्र, विविधला त्याची गोष्ट पडद्यावर कशी दिसेल, याची चांगली जाण होती आणि त्याने ती त्या पद्धतीने पडद्यावर आणली. त्याच्या मागे झी स्टुडिओ निर्माता म्हणून उभं राहिलं आणि एक सुंदर चित्रपट आता प्रेक्षकांसमोर येतो आहे, याचा मला अतीव आनंद वाटतो आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
इंग्रजीत भूताचा समाचार घेणारे गुरुजी
या चित्रपटात मजेशीर इंग्रजी बोलत मंजुळाच्या भूताचं प्रकरण निकाली काढणाऱ्या गुरुजींची भूमिका ही एकप्रकारे वेगळी काही भूमिका मिळाली तर ती करावी असं सदैव वाटणाऱ्या माझ्यासारख्या कलावंताच्या दृष्टीने महत्त्वाची होती, असं अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं. ‘कलावंताला वेगळी भूमिका करायला नेहमीच आवडतं, पण तुम्ही एका पद्धतीची भूमिका चांगली करता हे सिद्ध झालं की तुमच्याकडे त्याच पठडीतल्या भूमिका येतात.
त्यातून आपण खूप बरे अभिनेते आहोत हे सांगण्याची आपली धडपड सुरू होते, त्यासाठीच्या वेगवेगळ्या वाटा आपण शोधत राहतो. या चित्रपटाच्या निमित्ताने विविधने मला ही व्यक्तिरेखा ऐकवली, तेव्हा काहीतरी साचेबद्ध असेल, अशीच माझी कल्पना होती. प्रत्यक्षात त्याने जेव्हा चित्रपटाची सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो हुशार दिग्दर्शक आहे. गंभीर असलेली ही व्यक्तिरेखा पाहताना लोकांना हसू येईल, अशापद्धतीने ती त्याने करून घेतली. आमच्या दोघांसाठीही ती तारेवरची कसरत होती, पण एकमेकांशी चर्चा करून आम्ही त्यात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मार्गदर्शनाखाली मी ही भूमिका साकारली आहे’, असं त्यांनी सांगितलं.
कलाकारांची निवड ही जमेची बाजू
कोणताही चित्रपट निवडताना गोष्ट चांगली असणं आणि दुसरं म्हणजे आपल्यासोबत कोण कोण कलाकार आहेत हे दोन निकष त्यातल्यात्यात आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, असं अभिनेता ओम भूतकर याने सांगितलं. ‘या चित्रपटात त्या त्या भूमिकेत चपखल बसणाऱ्या कलाकाराची निवड केली गेली आहे. त्यामुळे पटकथा ऐकल्यानंतर आणि मग कोण कोण कलाकार कुठली भूमिका करतायेत हे लक्षात आल्यावर हे सगळं अचूक जमून आलं आहे, याची जाणीव झाली. शिवाय, या चित्रपटातले सगळेच कलाकार अनुभवी आहेत, त्यांच्याबरोबर नेहमी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने बोलणं होतं, पण काम करायचा योग येत नव्हता. तोही या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला’, असंही ओमने स्पष्ट केलं.
मंजुळाने खूप त्रास दिला…
‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटातील मंजुळा नेमकी कोण आहे? याचं उत्तर अजून गुलदस्त्यात असलं तरी अभिनेत्री सई ताम्हणकरची भूमिका नक्कीच याच्या जवळपास जाणारी आहे, असा अंदाज ट्रेलरमधून येतो. तुंबाडचं हे रहस्य जपून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सईने या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेने आपल्याला खूप अस्वस्थ केलं, अशी भावना व्यक्त केली. ‘या चित्रपटात मी साकारलेल्या पात्राची आणि माझी विचारसरणी कुठेही जुळत नाही, त्यामुळे आम्हाला भेटायलाच खूप वेळ लागला आणि जेव्हा मला त्याची नस सापडली तेव्हा ते साकारताना मला खूप त्रास झाला इतकंच आता सांगते’, असं तिने नमूद केलं. प्रत्येक स्त्रीच्या मनात एक भीती असते, त्याचं प्रतिनिधित्व करणारी माझी भूमिका आहे. आणि हा विनोदी भयपट आहे, जे मराठीत फारसे झालेले नाहीत, त्यामुळे हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे, असंही तिने सांगितलं.
रिमेक करताना गोष्ट आपल्या मातीतले संदर्भ घेऊन येते…
‘तुंबाडची मंजुळा’ हा ‘सुलोचना फ्रॉम सोमेश्वर’ या कन्नड चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे आणि हा चित्रपट मराठीत करायला हवा, ही संकल्पना झी स्टुडिओजच्या बवेश जानवलेकर यांची होती, अशी माहिती दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी दिली. ‘मराठी-हिंदीत रिमेकची मोठी परंपरा आहे. याआधी राजा परांजपेंसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकाच्या ‘पाठलाग’ या चित्रपटाचा रिमेक हिंदीत ‘मेरा साया’ नावाने गाजला. शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’ या नाटकावरून जगभरात कलाकृती झाल्या, आपल्याकडे कुसुमाग्रजांनी त्यापासून प्रेरित होऊन ‘नटसम्राट’सारखं नाटक लिहिलं, ज्या नाटकात अगदी डॉ. लागू, दत्ता भट यांच्यापासून ते मोहन जोशींपर्यंत अनेकांनी भूमिका केल्या. त्याच्यावर चित्रपट झाला. त्यामुळे एकाच कलाकृतीवरून प्रेरित होऊन केलेली दुसरी कलाकृती भिन्नच असते’, असा मुद्दा जितेंद्र जोशी यांनी मांडला. तर अकिरा कुरोसावा यांच्या ‘सेव्हन समुुराई’ या चित्रपटावरही जगभरात झालेल्या कित्येक कलाकृती गाजल्या, मारिओ पुझोच्या ‘गॉडफादर’ कादंबरीवरून झालेल्या विविध कलाकृतींच्या आवृत्त्याही तितक्याच गाजल्या. त्यामुळे कुठल्यातरी गोष्टीवरून स्फूर्ती घेऊन मी नावीन्यपूर्ण कलाकृती करतो आहे हीसुद्धा एक गंमत असते, असं मत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलं.
‘आम्ही चेकॉव्हच्या एका गोष्टीवर आधारित नाटक केलं होतं. ते करताना गोष्ट तीच असली तरी मराठीत येताना पात्रांसकट सगळे संदर्भ बदलतात, त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी बदलते, ज्या भाषेत आपण करतो आहोत त्या भाषेतले, त्या मातीतले नवीन संदर्भ, तिथले मिथक त्यात जोडले जातात. एक वेगळं रसायन निर्माण होतं आणि मग मूळ गोष्ट किंवा कलाकृतीपेक्षा स्वतंत्र अशी कलाकृती जन्माला येते. रशियन गोष्ट महाराष्ट्रात येताना ती कोकणातली होते, तिथे कदाचित एखादी कोकणातील, एखादी पश्चिम महाराष्ट्रातली व्यक्तिरेखा येईल. त्यांच्यात संवाद घडेल. आणि मग असं वेगळेपण घेऊन कलाकृती साकारणं हे त्या दिग्दर्शक आणि कलाकारांसमोर एक आव्हानच उभं असतं, कारण त्यांना नव्याने ते भावविश्व घडवावं लागतं. ‘तुंबाडची मंजुळा’ ही अशाच पद्धतीने एक स्वतंत्र कलाकृती म्हणून तुमच्यासमोर येणार आहे’ असं मत ओम भूतकर याने व्यक्त केलं.
कुठल्याही गोष्टीचा बाऊ नको…
लवकरच ऐंशीवा वाढदिवस साजरा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. गावातल्या जाणत्या आणि हुशार आजींची भूमिका करणाऱ्या उषा नाडकर्णी ‘बिग बॉस मराठी’, ‘मास्टरशेफ’ अशा रिॲलिटी शोजपासून मालिका-चित्रपट सगळीकडे मोठ्या उत्साहात काम करताना दिसतात. या वयातही इतकी सगळी आव्हानं पेलून काम करण्याची ताकद माझ्या आईकडून मिळाली आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘छोट्या-छोट्या गोष्टींचा बाऊ करायचा नाही. माझी आई शिक्षिका होती, त्यावेळी पहाटे पावणेचारला उठून घरच्या सगळ्यांचं जेवण, डबे, इतर कामं आटपून ती कामाला जायची. अगदी उतारवयातही कुठल्याही कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं तिला पसंत नव्हतं. आज तिची तीच जिद्द, प्रेरणा घेऊन मी काम करते. वयोमानामुळे पाय सुजतात, चित्रीकरणाच्या लांबलेल्या वेळापत्रकामुळे जेवणखाण धड होत नाही. मग आजारपण येतं, रुग्णालयाची वारीही होते, पण बरं झालं की मी पुन्हा कामाला लागते’, असं त्यांनी सांगितलं.
कोट्यवधींची कमाई म्हणजेच यश का?
मराठी सिनेमा उत्तम चालतो आहे आणि त्याचा प्रचंड आनंद आहे, असं मत व्यक्त करतानाच एखाद्या चित्रपटाने कोट्यवधींचा व्यवसाय केला तरच तो चित्रपट यशस्वी होतो का? असा प्रश्न जितेंद्र जोशी यांनी उपस्थित केला. ‘काही चित्रपट हे काळाच्या कसोटीवर नंतर तपासले जातात, त्यांना उशिरा यश मिळतं. किंवा काही चित्रपटांना तितकं यश मिळत नाही, ‘सैराट’ने शंभर कोटी कमाई केली त्यापुढे एक-दोन कोटींची कमाई याला काही अर्थ नाही, असं म्हटलं जातं. पण, त्या चित्रपटाचा निर्माता तितकी कमाई करून दुसरा चित्रपट करू शकत असेल तर तेही यशच म्हणायला हवं. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी कितीतरी आशयघन चित्रपट दिले. त्यांच्या कुठल्याही चित्रपटाने २० कोटींची कमाई केली नाही. पण, त्यांनी त्यांच्या चित्रपटांमधून खूप वेगवेगळे विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले, त्यांच्याच मुशीतून गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, वरुण नार्वेकर यांच्यासारखे दिग्दर्शक घडले. त्यांच्या चित्रपटांमधून कलाकारांची एक वेगळी फळी उभी राहिली हेही मोठं यश आहे’, या दृष्टिकोनातूनही विचार व्हायला हवा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
