‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाची पहिल्या पोस्टरपासूनच सर्वत्र चर्चा होत आहे. यामध्ये कोणते कलाकार झळकणार? या सिनेमाची कथा नेमकी काय असेल? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अखेर या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आहेत त्यांची नावंही प्रेक्षकांसमोर उघड झालेली आहेत.

‘मंजुळा’ या नावाविषयी गावात तयार झालेलं गुढतेचं वलय, गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती आणि त्यांची उडालेली तारांबळ या टीझरमधून पाहायला मिळत आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या ५ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटातील गावकऱ्यांमध्ये एकाहून एक अतरंगी कलाकार दिसत असून यामध्ये जितेंद्र जोशी, ओम भूतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांचा समावेश आहे.

Award Banner

याचबरोबर सगळ्यात जास्त आकर्षणाचा विषय ठरली आहे टीझरच्या शेवटी एका अर्धवट बंद दाराआड उभी असलेली सई ताम्हणकर. यामध्ये सईची काय भूमिका असेल? याबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.

या चित्रपटाविषयी झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, “यापूर्वी प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता कशी वाढेल यावर आम्ही भर दिला. आता प्रदर्शित झालेल्या टिझरमधून दिसणारी कलाकारांची फौज, त्यांचे धमाल संवाद हे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुळात कोकण प्रांत आणि कोकणातील लोकांच्या गजाली हा कायमच आपल्या आवडीचा विषय असतो. कोकणातील अशाच एका गावाची, त्यातील गावकऱ्यांची आणि गावात घडणाऱ्या एका अद्भुत घटनेची गोष्ट म्हणजे ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट. सर्वच स्तरांतील, वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल आणि सहकुटुंब बघता येईल असा हा मनोरंजक चित्रपट झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर झी स्टुडिओजने पूर्णपणे निर्मितीची धुरा सांभाळली आहे याचा आनंद आहे.”

दरम्यान, ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाद्वारे विविध कोरगावकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाचं दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे.