Bandhu Marathi Movie : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आगामी ‘बंधू’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांची जोडी ‘बंधू’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन भावांच्या अतूट बंधाची आणि नात्यांच्या कसोटीची हृदयस्पर्शी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळेल.

आता गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात आगामी ‘बंधू’ चित्रपटाच्या टीमने पुण्यातील प्रसिद्ध भाऊसाहेब रंगारी गणपतीचं भक्तिभावाने दर्शन घेतलं. या चित्रपटातील भावांची जोडी उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. याप्रसंगी पुनीत बालन यांच्या हस्ते चित्रपटाच्या टीमला सन्मानित करण्यात आलं.

या कलाकारांनी एकत्रितपणे गणरायाची आरती करत बाप्पाचा आशीर्वाद घेतला. चित्रपटाच्या विशेष पोस्टरचं अनावरणही याप्रसंगी करण्यात आलं, त्यामुळे ‘बंधू’च्या प्रदर्शनापूर्वीचा हा भक्तिमय क्षण खास ठरला.

रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केलं आहे.

एका छोट्याशा गावात घडणारी ही गोष्ट. भावाच्या सुखासाठी स्वतःच्या वाट्याचे काटे दूर करणारा भाऊ, नात्यांमधला विश्वास, मनात दडलेला अहंकार आणि परिस्थितीसमोर उभी ठाकणारी भावनिक परीक्षा…या सगळ्यांचा वेध ‘बंधू’ सिनेमात घेता येणार आहे. नाती, भावना आणि संघर्षांची ही कहाणी पडद्यावरची न वाटता कुठेतरी आपल्या घरातलीच वाटते.

दोन भावांमधील अतूट प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्याची हळवी, भावस्पर्शी कहाणी घेऊन ‘बंधू’ हा चित्रपट २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.