Upendra Limaye Jogwa Movie National Award : मराठी सिनेसृष्टीला एक वेगळी दिशा देणारा, अंधश्रद्धेवर बोट ठेवणारा, सामाजिक विषयावर भाष्य करणारा ‘जोगवा’ चित्रपट २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, विनय आपटे, किशोर कदम अशा नामवंत कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. विशेषत: ‘जोगवा’ हा चित्रपट उपेंद्र लिमयेंसाठी गेमचेंजर ठरला. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अर्थात, ‘तायप्पा’च्या भूमिकेसाठी त्यांनीही तेवढीच मेहनत घेतली होती. नुकत्याच ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमयेंनी ‘जोगवा’बद्दलच्या या आठवणी सांगितल्या आहेत.
‘जोगवा’च्या शूटिंगदरम्यानच दिग्दर्शक राजीव पाटील यांनी ‘उप्या, तुला यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणार’ असं सांगितलं होतं. याबद्दल उपेंद्र लिमये म्हणतात, “जोगवा’ चित्रपटानंतर आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी बदलल्या. ‘जोगवा’नंतर मी एक दीर्घ श्वास घेतला कारण, ही सगळी धडपड त्या भूमिकेसाठीच सुरू होती. माझंही तेवढं नशीब म्हणून ती भूमिका माझ्याकडे आली. राजीव पाटील सिनेमा साइन करून माझ्या घरी आला आणि मला म्हणाला, ‘तुला वाटतं ना तू सॉलिड अभिनेता आहेस…आता मी तुला तायप्पाची भूमिका देतो, तू करून दाखव…नाहीतर, मी एक्सपोझ करेन अभिनेता म्हणून तुला किती मर्यादा आहेत’…तर हा असा राजीव पाटील होता. त्याने मला आव्हान म्हणून ती भूमिका दिली होती. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून आमचं खूप घट्ट बॉण्डिंग झालं होतं.”
ते पुढे म्हणाले, “जोगवा’चा एकही शॉट मला आठवत नाही की, सीनच्या आधी आम्ही काही चर्चा वगैरे केलीये. कारण, दोन महिने सराव सुरू होता…परफेक्ट क्लॅरिटी होती सगळ्या गोष्टींची, त्याने मला स्क्रिप्टमध्ये इंटरफेअर करायची मुभाही दिली होती. त्यानंतर माझे काही सीन एडिट करण्याचीही मुभा होती…एकंदर ते दिग्दर्शक आणि नटाचं हेल्दी नातं होतं. मला बऱ्याचदा मुलाखतीत विचारलं जातं, तुमचा ड्रीम रोल काय आहे? तर, जिथे अभिनेता म्हणून माझा कस लागेल तो माझा ड्रीम रोल.”
“राजीव सिनेमाच्या शूटिंगदरम्यान माझ्या एक्स्प्रेशनवर खूप खेळला होता. बऱ्याच ठिकाणी डोळ्यांचा क्लोज शॉट आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, ‘लल्लाटी भंडार’ गाण्यात एक खूप एक्स्ट्रीम क्लोझ शॉट आहे. तो शॉट संपला, क्लॅप झालं आणि राजीव म्हणाला, ‘उप्या यावर्षीचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नॅशनल अवॉर्ड तुला मिळणार! यावर्षी तरी भारतात दुसरं कुणीही यापेक्षा बरा शॉट देऊ शकत नाही!’ ही गोष्ट तो सेटवर बोलला होता आणि त्यावेळी एका मराठी नटाला, मराठी सिनेमासाठी ‘नॅशनल अवॉर्ड’ मिळेल याचा कुणी विचारही केला नसेल. ते इतिहासात कधीच झालं नव्हतं पण, राजीवचा दृढविश्वास होता. जर तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नाही, तर माझा राष्ट्रीय पुरस्कांवरचा विश्वास उडेल असं तो एकंदर म्हणत होता. म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं, मी पूर्ण सिनेमातील तुझं काम पाहतोय आणि त्यात हा शॉट म्हणजे ‘सोने पे सुहागा…’ असं कुणीच करू शकत नाही, त्यामुळे तुलाच नॅशनल अवॉर्ड मिळणार हे राजीवने सेटवरच सांगितलं होतं.” अशी आठवण उपेंद्र लिमयेंनी सांगितली.

याशिवाय काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत उपेंद्र लिमये म्हणाले होते, “अॅनिमल’मधील फ्रेडीच्या छोट्या कॅमिओ भूमिकेला मिळालेलं यश पाहून एक कलाकार म्हणून त्रास होतो. जर एवढं यश त्यावेळी तायप्पाला मिळालं असतं, तर काय मजा आली असती हे शब्दांत सांगता येणार नाही…असं एक कलाकार म्हणून मला नक्कीच वाटतं.”
