गणरायाच्या आगमनाचा उत्साह, ढोल-ताशांचा जल्लोष आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती देणारं ‘तुझे नाव घेता’ हे बहारदार गणपती गीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘मैत्रेया’ या आगामी चित्रपटातील हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
शिवम सिंग आणि अपूर्वा निषाद यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध झालेल्या या गाण्याला गुरू ठाकूर यांचे शब्द लाभले आहेत. तर पंकज पडघन यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. समर, आयुषी, स्काय आणि रूची हे कलाकार या गाण्यात झळकले आहेत. याशिवाय दिग्दर्शिका-अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर या दोघींची खास नृत्य अदाकारी या गाण्यात पाहायला मिळते. अनेक वर्षांनी या दोघींना एकत्र नृत्य करताना पाहाण्याची संधी प्रेक्षकांना यानिमित्ताने मिळाली आहे. १ मिनिट ३३ सेकंदाला या गाण्यात उर्मिला अन् त्यानंतर क्रांतीची एन्ट्री होते.
क्रांती रेडकर याबद्दल सांगते, “गणपती बाप्पा आणि आपल्या मराठी माणसाचं नातं खूप खास आहे. त्यामुळे ‘तुझे नाव घेता’ हे गाणं करताना त्यात भक्ती तर असावीच, परंतु त्याचबरोबर गणपतीच्या उत्सवाचा आनंद, उत्साह आणि जल्लोषही दिसावा, अशी आमची इच्छा होती. पंकज पडघन यांचं संगीत, गुरू ठाकूर यांचे शब्द आणि शिवम सिंग व अपूर्वा निषाद यांचा आवाज यामुळे गाणं खूप सुंदर जमून आलं आहे. उर्मिला आणि मी अनेक काळानंतर एकत्र नृत्य करताना दिसणार आहोत, त्यामुळे हा माझ्यासाठीही खास अनुभव आहे.’’
निर्माते मनोज खळतकर म्हणतात, ‘’हे गाणं ऐकताना आणि पाहताना प्रेक्षकांना उत्सवाचा आनंद मिळावा, हा आमचा प्रयत्न होता. गाण्याची चाल, संगीत आणि नृत्य यांचा सुंदर मेळ साधला गेला आहे. त्यात क्रांती आणि उर्मिलाच्या नृत्याची झलक प्रेक्षकांसाठी नक्कीच खास सरप्राईज आहे. गणपतीच्या उत्साहात हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे.”
मैत्री, जवळीक आणि त्यापलीकडे असलेल्या भावनांचा प्रवास या चित्रपटातून कशा पद्धतीने उलगडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. येत्या २३ ऑक्टोबरला हा ‘मैत्रेया’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
