बॉलीवूड असो वा मराठी कलाकार, सेलिब्रिटींना ऑनलाइन ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. काही कलाकार ट्रोलिंगबद्दल जाहिरपणे बोलत असतात. कलाकारांचे फोटो, सोशल मीडिया पोस्ट यावरून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा होतात. मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेही याला अपवाद नाही. तिनेही तिच्याबद्दल होणाऱ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी उर्मिला कोठारेचा अपघात झाला होता. त्या अपघातात तिला दुखापत झाली होती. त्यातून आता ती सावरली आहे आणि पुन्हा काम करतेय. उर्मिलाचं वैयक्तिक आयुष्याबद्दल ऑनलाइन बऱ्याच गोष्टी व्हायरल होतात. कारण ती व तिचा पती आदिनाथ कोठारे एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत. त्यामुळे या दोघांचं बिनसलंय, अशा चर्चाही होतात. आता अशा ट्रोलिंगचा परिणाम आपल्यावर होत नसल्याचं स्पष्ट वक्तव्य उर्मिलाने झी २४ तासशी बोलताना केलं.

ट्रोलिंगबद्दल उर्मिला कोठारे म्हणाली…

“ट्रोलिंगचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी कमेंट्स वाचतच नाही. कमेंट्समध्ये लोक खूप विषारी बोलतात, त्यामुळे मी लक्ष देत नाही. तसंही माझ्याकडे इतर खूप व्याप असतात, त्यामुळे कोण माझ्याबद्दल काय बोलतंय याकडे लक्ष देण्यात मला रस नाही. इंटरनेटवर आपल्याबद्दल काय बोललं जातंय याकडे लक्षच द्यायचं नसतं. इंटरनेटवर फिरत असणाऱ्या काही गोष्टी खऱ्या असतात तर काही खोट्या असतात. त्यामुळे मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन तुमच्यापर्यंत जे पोहोचतंय ते सगळं खरं आहे असं समजू नका. कारण त्यातलं काही खरं असेल तर काही खोटंही नक्कीच असू शकतं,” असं उर्मिला कोठारेने नमूद केलं.

मुलीला सोशल मीडिया पाहू देत नाही उर्मिला

उर्मिला कोठारे व आदिनाथ कोठारे यांना एक मुलगी आहे. तिचं नाव जिजा आहे. जिजाला सोशल मीडिया पाहू देत नसल्याचंही उर्मिलाने सांगितलं. “आम्ही जिजाला सोशल मीडियापासून दूर ठेवलं आहे. आम्ही तिला अगदी युट्यूबही पाहू देत नाही. आता आमच्याकडे ओटीटी शोज जास्त पाहिले जातात,” असं उर्मिला कोठारेने स्पष्ट केलं.

उर्मिला कोठारे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. तिने १४ वर्षांपूर्वी आदिनाथ कोठारेशी लग्न केलं. उर्मिलाने तिच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. सध्या ती ‘फिल्टर कॉफी’ या नाटकात काम करतेय. ‘पुन्हा घाशीराम कोतवाल’ नाटकातही उर्मिला छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारत आहे.