Vaibhav Mangle reveals his educational qualification: वैभव मांगले यांनी आजवर नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून, विविध कलाकृतींमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण, त्यांचे शिक्षण किती हे तुम्हाला माहीत आहे का?
नुकतीच वैभव मांगले यांनी आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेकविध गोष्टींवर वक्तव्य केले. त्यांनी त्यांच्या बालपणाबद्दल सांगितलेच; पण शिक्षण, मैत्री, नीतीमत्ता, कोकण अशा अनेक विषयांवरही त्यांनी त्यांची मते आणि त्यांचे अनुभव सांगितले. तसेच, ते अभिनय क्षेत्रात कसे आले, याबद्दलही त्यांनी खुलासा केला.
“वडिलांनी हट्ट केला आणि मला…”
वैभव मांगले म्हणाले, “दहावीनंतर मला आर्टसला जायचं होतं; पण वडिलांनी हट्ट केला आणि मला सायन्सला घातलं. मला सायन्स अजिबात आवडत नव्हतं. मला त्यातलं काहीच येत नव्हतं. कसाबसा मी बी.एस्सी. पास झालो. गायन, एकांकिका, कथाकथन या स्पर्धांमध्ये मी भाग घेतच होतो. शिक्षणात गती नाही; पण गायन, अभिनय यामध्ये गती आहे, तर आपण यामध्ये ओळख तयार करायला हवी, असं वाटत गेलं.”
पुढे ते म्हणाले, “बी.एस्सी. झाल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न होता. कोणी तर म्हणाले की, कंपनीत नोकरी कर. नोकरी मिळविण्यासाठी मी खूप भटकलो; पण नोकरी मिळाली नाही. दोन ठिकाणी नोकरी केली; पण फारसे बरे पैसे मिळाले नाहीत. खरं सांगायचं तर मला त्यातलं काही येतच नव्हतं. माझा असा विचार होता की, आर्टस घ्यावं. मला मराठी विषय आवडतो, त्यात एम.ए. करावं. कदाचित मी त्यात पीएच.डी.ही केली असती. मला प्रोफेसर म्हणून काम करायचं होतं, ती माझी इच्छा होती. मला ते करता आलं नाही. कला थंड बसली नव्हती… कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ती बाहेर येत होती. त्यानंतर मी डी.एड्. करण्याचा निर्णय घेतला. बी.एस्सी.नंतर मी दोन वर्षं डी.एड्. केलं. मला वाटतं की, आपण तेवढं गंभीरपणे आयुष्याकडे पाहत नाही. आपण काही ना काही करत पुढे पुढे जातो.”
“सहा महिन्यात मला…”
मुंबईत कसे आले, याबद्दल वैभव मांगले म्हणाले, “माझ्या वडिलांचे आतेभाऊ विलास कोळपे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होते, ते मुंबईमध्ये नाटकातही काम करायचे. एक दिवस मला म्हणाले की, तू इकडे का काम करतोयस? तू मुंबईत जाऊन स्ट्रगल कर. ते खात्रीनं म्हणायचे की, अभिनयात तिथे जे लोक काम करतात, त्याच्यापेक्षा तुला बरं काम येतं. अचानक माझ्या मनात पाल चुकचुकली की, ही एक नवीन संधी आहे की आपण अजून कुठेतरी वेगळीकडे भरकटत जाऊ. पण मी विचार केला की, आपण इथे जे काम करतोय, त्यात तरी कुठे बरं चाललंय? तर आपण ती संधी अजमावून बघूया. त्यानंतर मी एका वर्षासाठी मुंबईत आलो. त्यानंतर स्ट्रगल वगैरेचा काळ होता. सहा महिन्यांत मला ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ नाटकात काम मिळाले. त्यामुळेच मी मुंबईत आहे, असे म्हणायला हरकत नाही.”
“मुंबईत आल्यानंतर झालं काय की एक तर खूप वेगळ्या ठिकाणी आलो, जिकडे मला कोणी ओळखत नव्हतं. तुमच्यामागे काय करतोस सध्या, घरी बसलेलाच आहेस का, असा लोकांचा जो ससेमिरा असतो, तो बंद झाला. त्यातून बाहेर पडून मी एक वर्षासाठी मुंबईला आलो होतो. सुदैवानं ते काम मिळालं. माझ्याकडे जी कला होती, त्यातलं जे टॅलेंट होतं, त्यातली जी बुद्धी होती, ती मला दाखवता आली.”
“पुढे कामातून काम निर्माण होत राहिलं. तर अभिनयात काम करण्याचा निर्णय कुठे घेतला, कसा घेतला, तर मला वाटतं की, हा फार निर्णायक क्षण होता की काकांनी मला सांगितलं आणि मी मुंबईत स्ट्रगलसाठी आलो. असं वाटतं की, कदाचित डी.एड्. झाल्यानंतर मला सरकारी नोकरी मिळाली असती किंवा मी आर्टसला गेलो असतो, मी तिकडे प्राध्यापक झालो असतो, तर मी या क्षेत्रात आलोच नसतो. म्हणजे व्यावसायिक नट होणं, याचा मी माझ्या आयुष्याच्या नियोजनामध्ये दूरदूरपर्यंत विचार केला नव्हता”, अशा शब्दांत वैभव मांगले यांनी ते अभिनय क्षेत्रात कसे आले, ते स्पष्ट केले.
