चित्रपटांत दिसणाऱ्या कलाकारांविषयी चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. हे कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यात कसे वागतात, त्यांची जीवनपद्धती काय असते, हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे असते. जेव्हा कलाकार स्वत:च्या आयुष्यातली एखादी गोष्ट, आठवण सांगतो त्यावेळी त्याची मोठी चर्चा होताना दिसते. आता अभिनेता वैभव तत्त्ववादी(Vaibhav Tatwawadi) आपल्या एका वक्तव्यामुळे मोठ्या चर्चेत आला आहे.
काय म्हणाला अभिनेता?
अभिनेता वैभव तत्त्ववादीने एका मुलाखतीदरम्यान एक आठवण सांगितली आहे. तो म्हणतो, “मी भूत-पिशाच्च यावर विश्वास ठेवत नाही; पण माझा त्या शक्तीवर विश्वास आहे. मी गेल्या ८-१० वर्षांपासून योग अभ्यास करीत आहे. स्मशानात शूटिंग सुरू होतं आणि माझ्या भावानं मुंबईतून मला फोन केला आणि म्हटलं की, जर तू स्मशानात शूटिंग करतो आहेस, तर तू तिथे तुला वेळ मिळाल्यास ध्यान कर.
“मी शून्य मिनीट ते १२-१३ मिनिटांचे जे ध्यान असतं, ते करतो. तो म्हणाला की, मी अनेक योगाचार्यांकडून ऐकलं आहे की, स्मशान ही खूप शक्तिशाली जागा असते, तिथे ध्यान केलं, तर वेगळा अनुभव असू शकतो. शूटिंगदरम्यान मी विचारलं की, सर, अर्ध्या तासाचा ब्रेक आहे ना आता. तर ते म्हणाले की, हो तू व्हॅनिटीमध्ये बस. मी म्हटलं नाही, मी इथेच बसतो. मी शब्दांत सांगू शकत नाही; पण तो खूप शक्तिशाली अनुभव होता. स्मशान ही काही खूप छान जागा नाही, ज्याबद्दल विचार केला जाऊ शकतो. मात्र, मी ज्यावेळी ध्यान केले, तो अनुभव खूप चांगला होता, जो मी कधीही विसरणार नाही.”
वैभव तत्त्ववादीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, २०११ ला प्रदर्शित झालेल्या ‘फक्त लढ म्हणा’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केले होते. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘सुराज्य’ चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याबरोबरच तो ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉटस अप लग्न’, ‘कान्हा’, ‘पाँडिचेरी’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘चीटर’, ‘महाराज’, ‘आर्टिकल ३७०’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘निर्मल पाठक की घर वापसी’, ‘मणिकर्निका : द क्वीन ऑफ झांसी’, ‘त्रिभंगा’ अशा अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि वेब सीरिजमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.