Vaishali Samant Husband Dattatray Samant : ‘मेरा दादला’, ‘ऐका दाजिबा’, ‘चम चम करता’ अशी एकापेक्षा एक सुपरहिट आणि सदाबहार गाणी लोकप्रिय गायिका वैशाली सामंतने गायली आहेत. वैशालीने मराठीसह हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध गाण्यांना सुद्धा आपला आवाज दिला आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण, तुम्हाला माहितीये का? आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी ही गायिका आठवी-नववीत असतानाच प्रेमात पडली होती.

काही महिन्यांपूर्वी वैशाली आणि तिचे पती दत्तात्रय सामंत यांनी दूरदर्शन सह्याद्रीला मुलाखत दिली होती. यावेळी या दोघांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली.

वैशाली सामंत सांगते, “आम्ही एकमेकांना बालपणापासून ओळखतो. मी शाळेत होते आणि हा कॉलेजमध्ये होता. यांचं कुटुंब नुकतंच पार्ल्यात राहायला आलं होतं आणि माझ्या घराच्या अगदी समोर याचं घर होतं. हळुहळू मग आमचं बोलणं सुरू झालं.”

यावर वैशालीचे पती दत्तात्रय सामंत म्हणाले, “मी समोरून यांच्या घरात पाहायचो की, दुसरं कोणी फोन उचलू नये. ही मला खिडकीतून दिसायची…वैशाली फोनजवळ असेल तेव्हाच मी हिला फोन करायचो.”

वैशाली पुढे सांगते, “आमचं बोलणं हळुहळू वाढलं आणि आम्हालाही जाणवलं हे प्रेम खरंय….मग आम्ही दोघांनीही घरी सांगितलं. आमचे आई-वडील म्हणाले, ‘अरे अजून तुम्ही लहान आहात.’ कारण, मी नववीमध्ये असतानाच घरी सांगून टाकलं होतं की, मला याच्याशी लग्न करायचंय. बालवयातला माझा भातुकलीचा खेळही संपला नव्हता आणि मी जाहीर केलं होतं की, मला याच्याशीच लग्न करायचंय.”

दत्तात्रय सामंत यावर म्हणाले, “माझ्या घरी तसा काही प्रॉब्लेम नव्हता कारण, मी वयाने मोठा होतो. ही आठवी-नववीत होती, तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो. माझ्या आईला सुद्धा ही खूप जास्त आवडली होती.”

“पण, मी वयाने लहान होते..हळुहळू मग वय वाढत गेल्यावर घरच्यांनाही समजलं की, हे दोघंही फार सिरिअस आहेत. दोघांच्या आई-बाबांनी शिक्षणाकडे लक्ष द्या! असं सगळं समजावलं. पुढे, अभ्यास, शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर मग आमचा साखरपुडा झाला. मास्टर्स डिग्री दोन वर्षांची असते…माझं मास्टर्सचं पहिलं वर्ष पूर्ण झालं…तोपर्यंत आम्ही एकत्र फिरायचो वगैरे…तेव्हा मग आमचा साखरपुडा आणि लग्न छानरित्या पार पडलं.” असं वैशालीने सांगितलं.

वैशाली सामंत करिअरबद्दल म्हणाली, “गाण्याकडे तू आवड म्हणून नको, तर प्रोफेशन म्हणून बघ, याची जाणीव मला दत्तात्रयमुळेच झाली. कारण, गाण्यात करिअर करणं म्हणजे नेमकं काय? हे माझ्या घरी काहीच माहिती नव्हतं. त्यात इंडस्ट्रीबद्दल खूप काही चर्चा असतात… म्हणून घरच्यांना माझी काळजी होती. पण, हा ( पती ) माझ्या करिअरबाबत खूप क्लिअर होता…त्यामुळे मलाही समजलं की मी काय केलं पाहिजे. मला हळुहळू मग गाण्याच्या विविध संधी मिळत गेल्या आणि मग जाणीव झाली की, आपण जे करतोय ते योग्य करतोय.”