Vandana Gupte Balasaheb Thackeray : ‘पछाडलेला’, ‘बाईपण भारी देवा’, ‘टाइमप्लीज’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करून ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंनी मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना लहानपणापासून घरीच कलाक्षेत्राचा वारसा लाभला. ठाकरे कुटुंबीयांबरोबर सुद्धा त्यांचं फार पूर्वीपासून छान नातं आहे. राज व शर्मिला ठाकरेंच्या त्या आताही शेजारीच राहतात. तर, बाळासाहेब ठाकरेंबद्दलचे किस्से त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहेत.

वंदना गुप्ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “आता राजा ( राज ठाकरे ) आणि आम्ही अगदी शेजारीच राहतो. मुख्य म्हणजे बाळासाहेब होते…त्यांचं कलाकारांवर फार प्रेम होतं. आमच्या आईला ( दिग्गज शास्त्रीय गायिका माणिक वर्मा ) क्रिकेटची फार आवड होती. एकदा मी आणि आई ब्रेबॉर्न स्टेडियमवर मॅच पाहायला जात होतो. तेवढ्यात बाळासाहेब भेटले आणि त्यांनी आम्हाला विचारलं, कुठे चाललात? कारण, ते सुद्धा मॅच पाहायलाच येत होते. आमची स्टेडियममध्ये तिकिटं दुसरीकडे होती. पण, बाळासाहेब आम्हाला म्हणाले, ‘चला माझ्याबरोबर…’ मग, त्यानंतर प्रत्येकवेळी जेव्हा ते मॅचला जायचे तेव्हा आम्हाला आवर्जून विचारायचे. तुम्ही येताय का? मग मी आणि आई जायचो.”

“पुढे, माझं लग्न झालं…आणि माझे पती सीकेपी आहेत. त्यामुळे बाळासाहेब प्रचंड खूश झाले होते. लग्नानंतर मग मी, शिरीष, स्वत: बाळासाहेब आणि आमच्याबरोबर ग्रुपमध्ये आणखी दोन-तीन जण होते. आम्ही एक ग्रुप केला होता…आम्ही सगळे मग वर्ल्डकपच्या शेवटच्या ज्या तीन मॅचेस व्हायच्या, त्या एकत्र पाहायचो. कधी बाळासाहेबांच्या घरी, कधी आमच्या घरी…असं प्लॅन करून आम्ही क्रिकेट मॅचेस पाहिल्या आहेत. एकंदर आमचं एकमेकांच्या घरी खूप येणं-जाणं व्हायचं.” असं वंदना गुप्तेंनी सांगितलं.

दुसरा एक किस्सा सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या, “एकदा मी त्यांच्या घरी गेले, नेमकी तेव्हाच त्यांची मिटींग सुरू होती. त्यावेळी बाळासाहेबांना एक मिस इंडियाचा खिताब जिंकलेली मुलगी भेटायला आली होती, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ती खास आलेली. पण, मी गेल्यावर मला पाहून, बाळासाहेब स्वत: उभे राहिले…त्यांना सगळ्यांना कळेना…की, ही कोण आहे. ते नेहमी सर्वांना माझी ओळख करून द्यायचे…रंगभूमीवरील ही सर्वात छान अभिनेत्री आहे. त्यांच्या मार्मिक महोत्सवात दरवेळी मोहन वाघांचं नाटक व्हायचं आणि त्या नाटकांमध्ये मी असायचे. तर, त्यांना ते फार आवडायचं. मोहन वाघांच्या संस्थेत मी जवळपास ९-१० नाटकांमध्ये काम केलेलं आहे.”

“मला अजूनही आठवतंय…त्यांच्या महोत्सवात पहिल्या वर्षी मी ‘झुंज’ नाटकात काम केलं होतं. मीनाताई आणि ते बसले होते..त्यावेळी त्यांनी विचारलं होतं की, ही चिमुर्डी मुलगी कोण आहे? मग ताईंनी त्यांना सांगितलं होतं, आपल्याकडे येते ती माणिकबाईंची मुलगी आहे ही…तर असे आमचे कौटुंबिक संबंध खूप छान होते. आम्ही दरवर्षी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी जायचो. तेव्हा कलानगरला प्रचंड गर्दी व्हायची. त्यांचे बरेच फोटो आहेत माझ्याकडे…त्यांच्यावर लोकांचा खूप जीव होता आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्रासाठी खूप केलं.” असं वंदना गुप्तेंनी सांगितलं.