Vandana Gupte Birthday celebration : वय हा केवळ आकडा असतो, हे आपल्या उत्साहातून सिद्ध करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मराठी रंगभूमी आणि सिनेविश्वात अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या वंदना गुप्ते यांचा ७४ वा वाढदिवस नुकताच ‘रावण कॉलिंग’ चित्रपटाच्या सेटवर उत्साहात साजरा करण्यात आला. सहकलाकारांनी दिलेल्या खास सरप्राईजमुळे हा दिवस त्यांच्यासाठी अधिक खास ठरला.

१६ जुलै रोजी वंदना गुप्ते यांचा ‘रावण कॉलिंग’ या सिनेमाच्या सेटवर वाढदिवस साजरा करण्यात आला. योगायोग म्हणजे याच दिवशी चित्रपटाच्या शूटिंगचाही शेवटचा दिवस होता. त्यामुळे संपूर्ण टीमने सेटवर आनंद साजरा करीत वंदना गुप्तेंना खास सरप्राईज दिलं. या घटनेचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यातील त्यांचा उत्साह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्यावर कमेंट्समध्ये अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘रावण कॉलिंग’च्या सेटवर वंदना गुप्तेंचा वाढदिवस साजरा

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वंदना गुप्ते यांनी वाढदिवसाची टोपी घातलेली दिसते. ‘गल्लां गुडियां’ या गाण्यावर त्या आनंदानं डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी केक कापून सहकलाकारांसह वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री पूजा सावंतनं त्यांना केक भरवीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सचित पाटील, गौरव घाटणेकर यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते. वंदना गुप्ते आणि पूजा सावंत यांचा हा आनंदी अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावर पोस्ट करित लिहिलं, “आमच्या ‘रावण कॉलिंग’ या सिनेमाचं शूटिंग माझ्या वाढदिवसाच्या दिवशी संपलं. मला हे नक्की सांगावंसं वाटतंय की, माझे सर्व सहकलाकार पूजा सावंत, सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, सचित पाटील व गौरव घाटणेकर यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असून, त्यामध्ये काम करताना खूप मजा आली. तसेच दिग्दर्शक अभिषेक गुणाजी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही खूप छान होता. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,”

वंदना गुप्ते यांना कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

वंदना गुप्ते यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वे व प्रार्थना बेहेरे यांनी रेड हार्ट इमोजीद्वारे प्रेम व्यक्त केलं. तर, तुषार देशमुखनं लिहिलं, “लव्ह यू वंदूताई… अशीच सदैव हसतमुख राहा,” अशी कमेंट केली. अमेय हुनसवाडकरनं लिहिलं, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो,” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. वंदना गुप्ते यांचा उत्साह आणि आनंदानं केलेलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहून नेटकऱ्यांनीही त्यांच्या उत्साहाचं भरभरून कौतुक केलं आहे.