‘आमने सामने’ नाटकाच्या टीमचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. केतकी पालव आणि रोहन गुजर यांनी व्हिडीओ शेअर करत निर्मात्यांनी या नाटकातून अचानक रिप्लेस केल्याचं सांगितलं. यानंतर लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी नाण्याची दुसरी मांडली. पण, शेवटी रोहन-केतकीने मानधनाचा आकडा सांगत पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणात आपली शेवटची बाजू प्रेक्षकांना सांगितली. यावर आता ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंनी भाष्य करत या कलाकारांचे कान टोचले आहेत.
वंदना गुप्ते म्हणाल्या, “लीना आणि मंगेश मी तुमचा व्हिडीओ पाहिला. मला खरंच फार वाईट वाटलं, मलाही भरून आलं. पण, आपणही कलाकार आहोत आणि आपण या सगळ्यातून गेलेलो आहोत. मलाही आठवतंय…सुरुवातीला मला ८० रुपये मिळायचे, ते शंभर रुपये करा यासाठी मी मोहन काकांना जवळपास १५ वेळा तरी सांगितलं होतं. तेव्हा मग त्यांनी शंभराव्या प्रयोगाला माझं मानधन वाढवलं होतं. हे सगळं ठिके…पण, आपण असं करत नाही ना गं, अचानक त्या कलाकारांना थांबवायचं आणि सांगायचं नाही हा तुमचा शेवटचा प्रयोग आहे. असा आपला कुणी अपमान केला तर आपल्याला सहन होईल का? मंगेशलाही सहन होणार नाही. एक पद्धत असते सांगायची. विचार करून या गोष्टी करायला हव्या होत्या, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे.”
“याशिवाय, रोहन आणि तिने मानधन मागितलं तर…त्यांनाही असं वाटतं की, आपलाही या नाटकात हातभार आहे. लीना आणि मंगेश मी तुम्हा दोघांनाही सांगते, निर्मात्यांना आपण मानधनाबाबत विचारू शकतो पण, अगदी तुमच्या हाऊसफुल्लमधलं सगळंच द्या असं मी म्हणत नाही. पण, कोणत्याही कलाकाराला वाटू शकतं ना. कारण, ही माणसं तुमच्याशी पाच वर्षं जोडली गेलीत त्यामुळे असं करू नका. बरं मानधनात वाढ मागताना त्यांनीही विचार केला पाहिजे…तीन-तीनवेळा तुम्ही कसं मागता आणि तुम्ही ( लीना-मंगेश ) सुद्धा अचानक काढून टाकता आणि सांगता हा तुमचा शेवटचा प्रयोग आहे हे सुद्धा चुकीचं आहे. मला हे पटलेलं नाहीये…दोघांचंही नाही पटलंय. आता रोहन आणि ते लोकही नवीन आहे…हळुहळू त्यांनाही अनुभव येईल. आता मी ५० वर्ष झाली काम करतेय तरीही मानधन वाढवा म्हणून सांगताना बिचकते. आपल्याला थोडे हक्काचे पैसे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे यावर विचार करा आणि कलाकारांसाठी अशी कॉन्ट्रोव्हर्सी चांगली नाही. तुम्ही कलाकार म्हणून सांगतेय…निर्माते म्हणून सांगत नाहीये.” असं वंदना गुप्तेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, वंदना गुप्तेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. याशिवाय रिप्लेसमेंट करणं चुकीचंच होतं असंही अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
