ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते गेली अनेक वर्षं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्या अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन आल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. मनोरंजनसृष्टीतील दिलखुलास अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. त्या नेहमीच त्यांना आलेले अनुभव, काही मजेदार किस्से चाहत्यांसह शेअर करत असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्तेंनी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याबरोबर त्यांचं नातं कसं आहे हे उलगडलं आहे.

वंदना गुप्ते यांचे शर्मिला ठाकरे यांच्याशी खूप जुने संबंध आहेत. गेली अनेक वर्षं या दोघी एकमेकांना ओळखतात. दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात त्यांची घरं आहेत, त्यामुळे अनेकदा त्यांचं भेटणं होत असतं. तर राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नापूर्वी वंदना गुप्ते त्यांची प्रेमपत्रं एकमेकांपर्यंत पोहोचवायच्या, असा खुलासा त्यांनी केला आहे.

वंदना गुप्ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “मोहन वाघ आणि आम्ही एकाच मकरंद सोसायटीमध्ये राहायचो. लहानपणापासूनच आमचं त्यांच्या घरी येणं-जाणं असायचं. अगदी समोरच घर होतं…त्यामुळे आमचं सर्वांचं नातं खूपच छान होतं. शर्मिला त्यावेळी लहान होती…तिला गाडी सुद्धा चालवायला मी शिकवली होती. आमची पहिल्यापासून खूप छान जवळीक होती. त्यावेळी राज आणि ती एकत्र फिरायचे. मला चांगलं आठवतंय तेव्हा मोहन वाघ हिची वाट पाहत सोसायटीच्या गेटजवळ उभे होते. शर्मिला दिसायला पण देखणी होती. मी तेव्हा कुठून तरी आले होते आणि शमी तेवढ्यात आली आणि मागून येऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाली, ‘मी तुझ्याबरोबर होते हा…’ त्यानंतर मी समोर पाहिलं तर मोहन वाघ उभे होते. मी पण तिला बरं म्हटलं. तेव्हा मग मला समजलं की यांचं काय सुरूये. मी त्यांच्या चिठ्ठ्या पोहोचवल्या होत्या. त्यांच्या लग्नात सुद्धा आम्ही खूप धमाल केली होती. आताही ते लोक माझ्या शेजारीच राहतात.”

जुन्या आठवणीत सांगत एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाल्या होत्या, “मी आणि शर्मिला आम्ही दोघींनी मिळून एकत्र खूप धमाल केली आहे. राज आणि शर्मिला यांना मी खूप जवळून पाहिलंय. मी त्या दोघांची प्रेमपत्रं पोहोचवली आहेत. आमची ती मैत्री आजवर टिकून आहे आणि राजाला ( राज ठाकरे ) या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आताही शिवाजी पार्कला आम्ही शेजारी राहतो त्यामुळे सतत भेटणं होत असतं” असं वंदना गुप्तेंनी सांगितलं.”