Marathi actress Varsha Usgaonkar cheated in a investment fraud: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या वर्षा उसगांवकर आजही विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
वर्षा उसगांवकर यांच्यासह आणखी काही अभिनेत्रींचीदेखील फसवणूक झाली आहे. बांधकाम व्यावसायिक व निर्माता अविनाश जाधव याने ही फसवणूक केली आहे. याबाबत शिवाजी पार्क पोलिस ठाण्यामध्ये अविनाश जाधवविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वर्षा उसगांवकरासह चार जणांची आर्थिक फसवणूक
मृणालिनी सुभाष जांभळे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्या मराठी चित्रपट आणि नाटकांत काम करतात. त्यांची अविनाश जाधवबरोबर ओळख होती. डोंबिविलीमधील एका प्रकल्पामध्ये गुंतवणुक करण्यासाठी पैसे घेतले होते. त्याने पैसे घेतले होते. तसेच, एका वर्षात जी रक्कम गुंतवली आहे, ती परत देण्याची हमीदेखील त्याने दिली होती. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान मृणालिनी जांभळे, वर्षा उसगांवकर आणि इतर तीन जाणांनी चेक आणि ऑनलाइन माध्यमातून एकूण ४७ लाख रुपये दिले होते. त्यावेळी अविनाश जांभळेने उत्तम नफ्यासह हे पैसे परत करण्याचे सांगितले होते. अविनाश जांभळेने सुरुवातीला चार लाख ५२ हजार परतही केले होते. मात्र, त्यानंतर त्याने घेतलेले पैसे परत केले नाहीत.
तक्रारीमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जेव्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अविनाश जाधवने त्याचा मोबाईल नंबर आणि पत्ता बदलला. जेव्हा डोंबिवलीमध्ये भेटून याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने धमकी दिली की, मी पैसे देणार नाही, काय करायचे आहे ते करा. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मृणालिनी जांभळे आणि अन्य कलाकारांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यामध्ये तक्रारदेखील केली आहे.
वर्षा उसगांवकर यांची मराठी सिनेसृष्टीत ड्रीमगर्ल, अशी ओळख आहे. वर्षा उसगांवकरांनी १९८६ ला ‘तुझ्यावाचून करमेना’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. १९८७ ला गंमत जंमत या चित्रपटातून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली.
रंग प्रेमाचा, साक्षात्कार, सगळीकडे बोंबाबोंब, आमच्यासारखे आम्हीच, ऐकावे ते नवलच, सवत माझी लाडकी, तिरंगा, साथी, परदेसी, शेजारी शेजारी, अफलातून अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सध्या वर्षा उसगांवकर मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मन उधाण वाऱ्याचे, सुख म्हणजे नक्की काय असतं, एकाच माळेचे मणी अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान, आता कलाकारांचे पैसे त्यांना परत मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
