Varsha Usgaonkar Manasi Naik viral video: मराठी कलाविश्वातील कलाकारांमध्ये जिव्हाळ्याचे नाते असल्याचे दिसून येते. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये वर्षा उसगांवकर यांनी मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकची नजर काढली आहे. मानसी व वर्षा यांच्यातील प्रेमळ नाते दाखविणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
मानसी नाईकने सोशल मीडियावर तिला पुरस्कार मिळाल्याची पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मानसीच्या या पोस्टमध्ये तिला सिनेविश्वाचा एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यांनी मानसीची नजर काढली. त्यांचा कँडिड व्हिडीओ मानसीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
वर्षा उसगांवकर यांनी काढली मानसीची नजर
यावेळी वर्षा यांनी सुंदर अशी लाल रंगाची साडी स्टाईल केली होती; तर मानसीने पारंपरिक काळ्या रंगाची साडी नेसली होती. यावेळी तिने केसांत माळलेला गजरा आणि पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत होता. मानसी पुरस्कार घेण्यासाठी मंचावर येताच वर्षा यांनी दोन्ही हातांनी मानसीची नजर काढली आणि तिला मायेने जवळ घेतले. दोघींमध्ये संवाद झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर मानसीने इन्स्टाग्रामवर लिहिले, “काल मला खूप कृतज्ञ वाटलं. ‘सिनेकाइंड’कडून मिळालेली कौतुकाची एक सुंदर भेट आणि त्यानंतर मंचावर सादरीकरण करण्याचा आनंद — एका कलाकारासाठी या दोन गोष्टींचं महत्त्व खूप जास्त असतं. एक कलाकार म्हणून आपल्या कामाचं कौतुक होणं आणि अभिनयाच्या माध्यमातून कथा मांडता येणं, यापेक्षा जास्त समाधान देणारं दुसरं काहीही नाही. सुंदर वर्षा उसगावकरमॅडम, ही भेट माझ्या हाती सोपवल्याबद्दल आणि हा क्षण अविस्मरणीय बनवल्याबद्दल तुमचे खूप आभार.” मानसी नाईकला पुरस्कार मिळाल्याबद्दल नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
